धुळे पोलीस अधीक्षकांनी अंध कलावंताकडून पाच हजारांचे कॅलेंडर विकत घेतले
धुळे : अंध असुनही इतरांपुढे हात पसरण्याचे सोडून स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू करणाऱ्या बासुरी वादकाकडू सर्व कॅलेंडर विकत घेत धुळ्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवले.
पाच हजार दिले अन् सर्व कॅलेंडर घेतले : धुळे शहरात गरूड क्रीडा संकुलाबाहेर बासुरीच्या सुरात कॅलेंडर विक्रीचा व्यवसाय करणारे रोहिदास आल्हाद यांच्याबद्दल पोलीस अधीक्षकांना माहिती मिळाली होती. जन्माने अंध असुनही स्वतःचा व्यवसाय सुरु करत आत्मनिर्भर झालेल्या रोहिदास आल्हाद यांना आपल्या दालनात बोलावून त्यांचा सन्मान केला. यावेळी आल्हाद यांच्या दिव्यांग पत्नी गंगुबाई सोबत होत्या. पोलीस अधीक्षकांनी पाच हजारांचे कॅलेंडर विकत घेतले आणि सर्व पोलीस स्टेशनमध्ये रोहिदास यांच्याकडून घेतलेले कॅलेंडर लावण्याचा निर्णय घेतला. या मोबदल्यात रोहिदास आल्हाद यांनी बासुरीच्या सुमधुर संगिताने उपस्थितांचे मनोरंजन केले. यावेळी पोलिसांसह पत्रकारांनीही त्यांच्या कलेला टाळ्यांच्या गजरात दाद दिली.
बासुरीच्या सुरांनी धुळेकर होतात मंत्रमुग्ध : रोहिदास आल्हाद यांच्या बासुरीचे सुर गेली अनेक वर्षे धुळेकर ऐकत आहेत. ओल्ड इज गोल्ड असलेली सदाबहार जुनी गाणी बासुरीच्या सुरात ऐकताना अनेकांना त्यांच्या या कलेचे आश्चर्य वाटते. एसबीआयच्या मुख्य शाखेबाहेर त्यांनी अनेक वर्षे वाजविलेली बासरी जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली. त्या मोबदल्यात त्यांना उदरनिर्वाहापुरती रक्कमही मिळत गेली. पण ती भिक्षा नव्हती तर त्यांच्या कलेला दर्दी रसिकांनी दिलेली दाद होती. एसबीआयच्या शाखेत तासन् तास रांगेत उभे राहणाऱ्या धुळेकरांना बॅंकेचे कंटाळवाने काम आल्हादांच्या बासुरीमुळे सहज करता आले. त्यांनी बासुरी वाजवण्यासाठी कुठेही शास्त्रीय रियाज केला नाही. परिस्थितीने त्यांना ही कला इतकी अवगत झाली की तिने शास्त्रीय संगीत विशारदालाही लाजविले. त्यांच्या बासुरीच्या सुरांनी धुळेकरांना मंत्रमुग्ध करून सोडले आहे. म्हणूनच धुळे जिल्ह्यातील माध्यमांनी त्यांच्या कलेची वेळोवेळी दखल घेतली.
हात पसरणे सोडले आणि व्यवसाय सुरू केला : आल्हाद यांना काही कारणास्तव एसबीआयची जागा बदलावी लागली. आता ते गरूड क्रीडा संकुलाबाहेर बासुरी वाजवतात. विशेष म्हणजे त्यांनी आता कॅलेंडर विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. कॅलेंडर विकत घेताना तुम्हाला बासुरीच्या सुरात तुमची आवडती गाणी ऐकायला मिळणार आहेत. तुम्ही या व्यापारी संकुलात काहीही खरेदी करायला गेले तरी तुमची पाऊले आल्हादांच्या कलेसमोर आपोआपच मंद होतील.
दिव्यांग पत्नीची खंबीर साथ : रोहिदास आल्हाद आणि त्यांचे भाऊ जन्माने अंध आहेत. त्यांची पत्नी गंगुबाई दिव्यांग आहे. मोराणे गावात राहणाऱ्या या कुटूंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी रोहिदास यांच्यावर आहे. रोहिदास आल्हाद यांच्या जीवन संघर्षात पत्नी गंगाबाईंची सावलीसारखी खंबीर साथ आहे.
श्रीकांत धिवरे सामाजिक बांधिलकी जोपासणारे पोलीस अधिकारी : पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना धुळे जिल्हा पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक म्हणून रुजू होऊन महिना झाला. ते सामाजिक बांधिलकी जोपासणारे पोलीस अधिकारी असल्याचे त्यांच्या कामावरून दिसते. हिंसाचाराने होरपळलेल्या सांगवी गावात पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबीर आयोजित करून त्यांनी आदिवासी तरूणांना पुन्हा योग्य दिशा देण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही प्रकारच्या सुविधा नसताना स्वबळावर सराव करून सैन्यदलात भरती झालेल्या सोनगिरच्या दोन तरूणांचा सत्कार करत त्यांनी इतर तरूणांना प्रोत्साहन दिले. तरूण पीढि ड्रग्जच्या आहारी जाऊ नये म्हणून धुळे शहरातील ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला. आता त्यांनी महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी एक महत्वपूर्ण काम हाती घेतले असून, महिलांसाठी काम करणाऱ्या एनजीओना वुमन सोशल ऑडिटची जबाबदारी दिली आहे. त्यातून आलेल्या सूचनांच्या अनुषंगाने उपाययोजना केल्या जाणार आहेत.
एकूणच गेल्या काही महिन्यांमध्ये घडलेल्या खुन्नशी घटनांमुळे पोलीस खात्याबद्दल धुळेकरांच्या मनात निर्माण झालेली भिती आता दूर होऊ लागली आहे.
हेही वाचा