जिल्हा रुग्णालयात होणार 200 खाटांची सुविधा
धुळे : शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या जुने जिल्हा रूग्णालयाचे श्रेणीवर्धन २०० खाटांमध्ये करणे, औषधीसाठा पुरविणे, साफसफाई कर्मचारी वाढविणे, सर्जरी विभाग सुरू करणे यासह रुग्णालयाचे अद्यावतीकरण करणे संदर्भात आ. फारुख शाह यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांचेकडे मागणी केली होती. त्यानुसार ना. तानाजी सावंत यांनी त्यांच्या दालनात विशेष बैठक बोलाविली होती. याबैठकीत जुने जिल्हा रूग्णालयाचे श्रेणीवर्धन २०० खाटांमध्ये करण्याचा आदेश देण्यात आला.
धुळे शहरातून हिरे वैद्यकीय महाविद्यालय चक्करबर्डी येथे गेल्यामुळे धुळेकर नागरिकांचे प्रचंड हाल होतात. रुग्णालय सुविधेसाठी शहरापासून ८ ते १० किमी. जाण्यासाठी नागरिकांना तोषिस पडते. पर्यायाने खिशाला न परवडणारे उपचार खाजगी दवाखाण्यात करावे लागतात. त्यासाठी शहराच्या मध्यवर्ती असणारे जुने जिल्हा रुग्णालय अधिकअद्यावत होणे गरजेचे आहे. ही गरज लक्षात घेवून आ. फारुख शाह यांनी विशेष प्रयत्न चालविले आहे. त्याचाच एकभाग म्हणून आ. फारुख शाह यांच्या मागणीवरून ना. तानाजी सावंत यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत जुने जिल्हा रूग्णालयाचे श्रेणीवर्धन २०० खाटांमध्ये करणे, औषधीसाठा पुरविणे, साफसफाई कर्मचारी वाढविणे, सर्जरी विभाग सुरू करणे यासह रुग्णालयाचे अद्यावतीकरण करणे, पुरेसे कर्मचारी नियुक्त करणे यासंदर्भात चर्चा करण्यात येवून जानेवारी महिन्यात जुने जिल्हा रूग्णालयाचे श्रेणीवर्धन २०० खाटांमध्ये करण्याबाबत ना. सावंतांनी आदेश दिलेत. तसेच जुने जिल्हा रूग्णालयात तातडीने आवश्यक तो औषध पुरवठा करण्यात यावा, रुग्णालयाची स्वच्छ्ता राखण्यासाठी स्वच्छता कर्मचारी आणि इतर आवश्यक कर्मचारी नियुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले.
सार्व.आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या दालनात झालेल्या बैठकीस आयुक्त धीरजकुमार, सहसंचालक डॉ. विजय कंधेवार, उपसंचालक डॉ. कपिल आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्ता देगावकर आदी उपस्थित होते. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य मंत्रालय मार्फत धुळेकर नागरिकांना जुने जिल्हा रूग्णालयाचे श्रेणीवर्धन २०० खाटांमध्ये करण्याची भेट नववर्षात मिळणार असल्याने आ. फारुख शाह यांनी ना. तानाजी सावंत याचे धुळेकर जनतेच्यावतीने आभार मानले आहे.