अन्यायकारक घरपट्टी रद्द करा, महानगरपालिकेवर जन आक्रोश मोर्चा
धुळे : वाढीव घरपट्टी कमी करण्यासह इतर मागण्यांसाठी समाज समता संघातर्फे फाशीपूल परिसरातील नागरिकांनी महापालिकेवर भव्य जन आक्रोश मोर्चा काढला. सिध्दार्थनगर येथून निघालेल्या या मोर्चाचे नेतृत्व संघटनेचे जिल्हाध्यक्ष किरण गायकवाड यांनी केले.
मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य सरकार समाजातील उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध विकास योजना तयार करतात. त्याचाच एक भाग अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजना अस्तित्वात आहे. त्याद्वारे शहरी भागामध्ये महापालिकेमार्फत विविध विकास कामे केली जातात. शासनाचे सुनिश्चित धोरण असताना सिध्दार्थनगर, नवजीवननगर, देशमुखनगर या परिसरात सन 2018 ते आजपावेतो एकही काम करण्यात आले नाही. शासनाने तर दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत मनपा प्रशासनाकडे भरपूर निधी पाठविला आहे. तो कुठे गेला, याची माहिती आम्हास नाही. आमच्या भागांमध्ये शंभर टक्के दलित समाजाचा रहिवास आहे. शासनाने ज्या उदात्त हेतूने सदर योजना तयार केली आहे, तो हेतू सफल होत आहे किंवा नाही हे बघण्याचे काम हानगरपलिका प्रशासनाचे आहे. असे असूनही या शंभर टक्के दलित वस्ती असलेल्या भागामध्ये सन 2018 पासून आजपावेतो एकही काम का झाले नाही, असा प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण झाला आहे.
धुळे महापालिकेतर्फे वाढविण्यात आलेली घरपट्टी कीमी करण्यात यावी, नारायण मास्तर चाळीजवळ असलेले पुरुष शौचालय मनपातर्फे का तोडण्यात आले याचा खुलासा करावा. मनपातर्फे धुळेकर नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविल्या जात नाहीत. रस्ते व गटारीच्या समस्या आहेत. रस्ते गटारी तयार करण्यात याव्यात. मुलभूत सुविधांअभावी जनतेची गैरसोय होत आहे. त्यामुळे आमच्या समस्या सोडवा अशी, मागणी मोर्चेकर्यांनी केली.
मोर्चात किरण गायकवाड, विनोद बाविस्कर, अजय बागुल, विशाल जाधव, लक्ष्मण केंदाळे, नरेंद्र बागुल, भुषण गायकवाड, प्रभात आखाडे, सिध्दार्थ पगारे, अजिंक्य गायकवाड, कल्पेश मगरे, अनिकेत गायकवाड, हेमराज क्षिरसागर, अमन जाधव, मयुर जाधव, राहुल बाविस्कर, राकेश मोरे, विकास शिंदे आदी सहभागी झाले होते.