‘डंकी’च्या रूपात प्रेक्षकांना ख्रिसमसची उत्तम भेट
2023 हे वर्ष खरंतर बॉलीवूडचा बादशाह किंग शाहरुख खानसाठीच होतं असं वाटतं. चार वर्षाचा ब्रेक आणि त्यानंतर काय जबरदस्त कमबॅक झालंय. आधी पठान मग जवान आणि आता डंकी. मागील दोन चित्रपटासारखा किंबहुना त्याहीपेक्षा मोठा चित्रपट डंकी ठरू शकतो. शिवाय या चित्रपटाचा दिग्दर्शक राजकुमार हिराणी आहे; ज्याने आजवर सहा चित्रपट केले, ते पण ब्लॉकबस्टर. त्यामुळे या दोघांची केमिस्ट्री बॉलीवूडमध्ये धमाका करेल यात शंका नाही.
डंकी हा चित्रपट पंजाबमध्ये राहणारा हारदयाल सिंग (हार्डी) ची कथा आहे. पंजाबमधील बरेच लोक कॅनडा, लंडन यासारख्या देशात स्थायिक झालेत. त्यांच्यासारखेच पंजाबमधील काही मित्रांना विदेशात स्थायिक होण्याचं स्वप्न असतं. परंतु पैशांची अडचण, शिक्षणाचा अभाव आणि विदेशात जाण्याची पात्रता नसणे यासारख्या गोष्टींमुळे ते जाऊ शकत नाहीत. मग आता शाहरुख यांना विदेशात अवैधरित्या घेऊन जाण्याचे ठरवतो. पंजाब ते विदेशात जाण्याचा हा प्रवास या चित्रपटाचा मुख्य गाभा आहे. त्यांना येणाऱ्या अडचणी, संकट, होणारा त्रास आहे तो तुम्हाला डंकी चित्रपटात बघायला मिळेल. शाहरुख खान त्यांना विदेशात पोहोचवेल का? विदेशात गेल्यावर त्यांना आणखीन कोणत्या संकटांना सामोरे जावे लागेल? हे सर्व तुम्हाला चित्रपट बघितल्यावरच कळेल.
चित्रपटाची कथा : राजकुमार हिराणी यांनी अप्रतिम लिखाण केलय. त्यांची कथा सांगण्याची जी लकब आहे ती अकल्पनिय आहे. पंजाबसारख्या छोट्याशा गावातून विदेशात जाण्याचे स्वप्न बघण्याचा जो क्षण आहे तो सूरेख आहे.
पटकथा : कथा सुरेख असल्याने पटकथा अप्रतिम झाली आहे. एक-एक क्षण, एक-एक प्रसंग अप्रतिम वाटतात आणि आपण फिल्म बघताना कधी हसू लागतो तर कधी रडू लागतो हे कळतही नाही. फिल्म कुठेही आपल्याला बोर होत नाही.
संवाद : संवाद सुंदर पद्धतीने लिहीले गेलेत. शिवाय आपली देशभक्ती पण जागवते आणि पंजाबमधील संवाद आणखीन छान वाटतात
संगीत : पार्श्वसंगीत चांगल असून, फिल्म बघताना सोनू निगमच्या आवाजातील सॅडसॉंग वातावरण निर्माण करण्यास पुरक ठरते व आपल्याला रडवण्यात यशस्वी ठरते.
अभिनय : शाहरुख खानने सुंदर अभिनय केलाय. पठाण, जवान ही एक ॲक्शन फिल्म होती. पण डंकी हा चित्रपट एकदमच वेगळा आहे आणि शाहरुख खानच्या करिअरचा हा उत्तम चित्रपट पण ठरू शकतो. अप्रतिम अभिनय केलाय. पंजाबच्या तरुणाची भूमिका छान साकारली. शिवाय कधी बोलून तर कधी न बोलता भाव व्यक्त करणे हे त्याला उत्तमपणे जमतं आणि रोमान्स करताना तर प्रश्नच नाही. यासह अन्य कलावंतांनी त्यात तापसी पन्नू, विकी कौशल, बोमनन इराणी यासह अन्य कलाकारांनी सुंदर अभिनय केला आहे.
दिग्दर्शन : आजवरचे बरेच सिनेमा आपण पाहिले असतील. ते नायकाच्या अवतीभवती फिरताना दिसतात. त्यात कधी शाहरुख खानसारखा बडा अभिनेता असेल तर तो चित्रपट त्या नायकाचाच वाटतो. परंतु राजकुमार हिराणीची स्टोरी टेलिंग इतकी पावरफुल असते कि ती टिपिकल राजकुमार हिराणीची आहे हे दाखवण्यात पुन्हा एकदा यशस्वी ठरतो. सर्व पात्रांना समान न्याय आणि कुठेही बड्या अभिनेत्याची फिल्म आहे असं दिसू न देता राजकुमार हिराणीची फिल्म आहे हे दिसून येतं. एक-एक सीन, एक-एक प्रसंग,अप्रतिम शूट केलाय, दिग्दर्शित केलाय. सोबत कॉमेडीचा तडका आणि मध्येमध्ये आपलं मन भरून आणून प्रेक्षकांना रडवणं हे राजकुमार हिराणीची उजवी बाजू आहे. त्यात पुन्हा एकदा ते यशस्वी झाले आहेत.
डंकीच्या रुपात हिराणी आणि एस. आर. के. पुन्हा धूम करतील यात शंका नाही. डंकीच्या रूपात प्रेक्षकांना सुंदर असे ख्रिसमस गिफ्ट दोघांकडून दिले गेले; जे गिफ्ट आपण पूर्ण परिवारासोबत बघू शकतो आणि त्याचा आनंद घेऊ शकतो यात शंका नाही. तर एकदा हा सिनेमा अवश्य पहा.
– राज किशन, चित्रपट समीक्षक, धुळे
(Mob : 9022835980)
(Mob : 9022835980)