राष्ट्रीय शिक्षण धोरण बहुजनांना गुलाम करणारे : माधुरी ब्रिजभूषण
धुळे : राष्ट्रीय शिक्षण धोरणाची पोलखोल करण्यासाठी धुळे येथे संत रविदास गार्डनमध्ये शिक्षण बचाव परिषद आयोजित करण्यात आली होती. मध्यप्रदेशातील जागृत आदिवासी महिला संघटनेच्या नेत्या माधुरी ब्रिजभूषण यांच्या हस्ते मनुस्मृतीचे दहन करून परिषदेचा शुभारंभ करण्यात आला. डॉ. उमेश बगाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शुभारंभ सत्रात रमेश बिजेकर, कॉ. किशोर जाधव उपस्थित होते.
माधुरी यांनी आपल्या मनोगतात केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणावर कडाडून टीका केली. राष्ट्रीय शिक्षण धोरण हे देशातील बहुजन, कष्टकरी समूहाला गुलाम करणारे आहे. हे धोरण म्हणजे एकीकडे भारतीय ज्ञान प्रणालीच्या चौकटीत ब्राह्मणी विचार, कल्पना, मूल्य रुजवणाऱ्या नवीन अभ्यासक्रमाची प्रस्थापना करणे तर दुसऱ्या अंगाने बहुविद्याशाखीय शिक्षण एकूणच ब्राह्मणी -भांडवली अर्थव्यवस्थेशी जोडणे असे आहे. हे धोरण जरी कौशल्य विकास आणि व्यवसाय यावर भर देत असले तरी निव्वळ कुशल मजूर निर्मितीचे साध्य ठेवणारे आहे. जात, वर्ग लिंगभेद अशा असमानतेच्या श्रेणीबद्ध भारतीय समाजरचनेत दीर्घकाळापासून ज्ञानबंदी लाभलेली आहे. तसेच हीन, अपवित्र ठरवलेल्या शारीरिक श्रमाची सक्ती केलेल्या स्त्रिया आणि शेतकरी, कारू नारू जाती पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य, भटक्या व आदिवासी जमाती अशा बहुसंख्य जनसमुहाच्या शैक्षणिक विकासासाठी राज्यघटनात्मक तसेच समाज वास्तवदर्शी निकष या धोरणाने स्वीकारलेले नाहीत. त्यामुळे हे धोरण देशातील बहुसंख्यांक दलित, आदिवासी, कष्टकरी, शेतकरी जातींच्या विरोधात असल्याचे प्रतिपादन काॅ. माधुरी यांनी केले.
रमेश बिजेकर यांच्या बीजभाषणनंतर डॉ. उमेश बगाडे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्वाला मोरे यांनी केले तर आभार राहुल कदम यांनी मानले.
दुपारी २ ते ३.३० या वेळेत प्रा. देवेंद्र इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्या सत्रात ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण: बहुजनांच्या कत्तलीचा जाहीरनामा’ या विषयावर अहमदनगर येथील श्रीकांत काळोखे केंद्र सरकारच्या शिक्षण धोरणाचा सविस्तर उहापोह केला. तर शिक्षण हक्क कायदा आणि शाळा संकुलचे मायाजाल या विषयावर विदर्भातील शिक्षण बचाव समितीचे विचारवंत डॉ. रेणुकादास उबाळे यांनी शाळा संकुलाच्या मायाजालामुळे विद्यार्थी कसे शिक्षण व्यवस्थेच्या बाहेर फेकल्या जातील यावर प्रकाश टाकला.
दुपारी ३.३० ते ५.०० या वेळेत डॉ. प्रभाकर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारोप सत्रात गुणवत्तेचे भ्रम – प्रा.मंगेश भुताडे (वाशिम), अशैक्षणिक कामाचे परिणाम – सतिष सातपुते (अहमदनगर), राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि शिक्षण बंदी – महेश पेडणेकर (सावंतवाडी) शिक्षणबंदी : आंदोलनात्मक भूमिका – अण्णा सावंत (जालना), शिक्षण बंदी अनुभव – मंगळे साहेब (शिरपूर) या विषयांवर आपले विचार मांडले.
अविनाश तायडे, विकास मोरे, अमोल पवार, श्रद्धा नीलिमा भामरे, मानसी पवार, पल्लवी पाटील, गोकुळ भामरे, अमोल शिरसाठ, दिपाली भालेराव, सुजाता मोरे, प्रसेनजित जगदेव, हर्षवर्धन पवार यांनी विविध ठराव वाचन करून परिषदेची सांगता झाली.
परिषद यशस्वी करण्यासाठी कॉ. दत्ता थोरात, ज्वाला मोरे, राकेश अहिरे, सतिष खैरनार, सिद्धांत बागुल, देवानंद अहिरे, प्रविण पानपाटील, मनोज नगराळे, कैलास धनगर, शरद वेंदे, अमोल शिरसाठ, संदीप बोरसे, हर्ष मोरे, मनीष दामोदर, अमोल पवार, अतुल बैसाणे, मधुकर थोरात, मनोहर कांबळे, सिद्धार्थ जगदेव आदींनी परिश्रम घेतले.