श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा संपर्क अभियानाचे धुळ्यात कार्यालय
धुळे : अयोध्या येथे येत्या 22 जानेवारीला श्रीराम मंदीर व श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या सोहळ्याच्या जनजागृतीसाठी श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापणा सोहळा संपर्क अभियान समितीच्या धुळे कार्यालयाचा सोमवारी शुभारंभ करण्यात आला.
यानिमित भारतभर समस्त राम भक्त जागो-जागी, शहर-शहर, गावो-गावी, वस्ती-वस्तीत एकत्र येऊन श्रीरामाची गाणी, भजन, कीर्तन करीत त्या सोहळ्याचे लाइव्ह प्रक्षेपण विविध ठिकाणी LED स्क्रीन लावून दाखविण्यात येणार आहे. तसेच भारतातील प्रत्येक मंदिरात शंखनाद करीत जल्लोष करण्यात येणार आहे. तत्पूर्वी या कार्यक्रमाचा नियोजनचा एक भाग म्हणून भारतभर “हर घर अक्षदा, हर घर भगवा, हर मंदिर मे राम, हर मंदिर अयोध्या” या घोषवाक्याच्या आधारे सर्व रामभक्त घरो-घरी जावून या अक्षदा व श्रीराम संदेश असलेले पत्रक देऊन अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी १ ते १५ जानेवारी दरम्यान अभियान राबविले जाणार आहे.
धुळे शहरात देखील या सर्व कार्यक्रमाचे नियोजन आणि सर्व कार्यक्रम योग्य रित्या पार पाडण्यासाठी २५ डिसेंबर रोजी श्री. नागेश्वर महादेव मंदिर, ग .नं. ५, पारोळा रोड, धुळे येथे सायंकाळी पाच वाजेला श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापणा सोहळा संपर्क अभियान समिती, धुळे यांच्या कार्यालयाचा शुभारंभ झाला. सकाळी सहा ते रात्री आठपर्यंत कार्यालयाचे कामकाज चालणार आहे, असे श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापणा सोहळा संपर्क अभियान समितीने कळविले आहे.