धुळे महानगरपालिका प्रशासकपदी आयएएस दर्जाचा अधिकारी नेमा
धुळे : येथील महानगरपालिकेच्या प्रशासकपदी आयएएस दर्जाचा अधिकारी नियुक्त करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने मंगळवारी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांना निवेदन देऊन केली.
याबाबत रणजीतराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. तसेच मुख्यमंत्र्यांना शेकडो पत्र व ईमेल पाठविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 30 डिसेंबर 2023 रोजी धुळे महापालिकेतील लोकप्रतिनिधींची मुदत संपत आहे. मनपाची सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक वेळेवर होऊ शकणार नसल्याने मनपावर शासकीय प्रशासक नियुक्त करणे क्रमप्राप्त आहे.
गेल्या पाच वर्षात महापालिकेत प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे. मनपाची आर्थिक व प्रशासकीय शिस्त बिघडली आहे. त्यामुळे आता मनपाचा कारभार चुकीच्या हातात जाणे आणखी धोकादायक ठरु शकते. मनपावर आयएएस दर्जाच्या अधिकार्याची नियुक्ती न झाल्यास गैरव्यवहार, भ्रष्टाचाराच्या फाईली गहाळ होण्याची भिती आहे. म्हणून मनपाच्या प्रशासकपदी जिल्हाधिकारी किंवा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती करावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे.
यावेळी जोसेफ मलबारी, रईस काझी, राजू डोमाडे, डी. जे. मराठे, जगन ताकटे, महेंद्र बागुल, शकीला बक्ष, जयश्री घरटे, जमीर शेख, राजेंद्र सोळंकी, भीका नेरकर, अशोक धुळकर, वाल्मिक मराठे, राहुल महाजन, समद शेख, हाजी हासमी कुरेशी, साबळे, शोएब अन्सारी, कल्पेश मगर, डॉमनिक मलबारी, कुणाल वाघ, दत्तू पाटील, आकाश बैसाणे, भटू पाटील, भूषण पाटील, इमरान पठाण, मयूर पाटील, नुरुद्दीन शहा, युनूस शेख, विरजित देसले, भाग्येश मोरे, वैभव पाटील, जावेद बेग, सोनू घारू, गोलू नागल, अस्लम खाटीक, जाकीर खान, सलमान खान, युनूस मिर्झा आदी पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते मुख्यमंत्री, राज्यपाल, विभागीय आयुक्त यांना शेकडो पत्र पाठवून वरील मागणी करणार आहेत. धुळेकर नागरिकांनीही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल, विभागीय आयुक्त यांच्या ईमेलवर किंवा व्हाट्सअपवर मॅसेज पाठवून सदर मागणी करावी, असे आवाहन रणजितराजे भोसले यांनी केले आहे.