अक्कलपाडा प्रकल्प भाजपनेच पूर्ण केला! पालकमंत्री गिरीश महाजन यांचा दावा
धुळे : पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासंदर्भात भारतीय जनता पक्षाने निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे. शहराला आता दोन दिवसाआड पाणीपुरवठा होऊ लागला आहे. धुळे शहराला वरदान ठरणाऱ्या अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण पालकमंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी केले. अक्कलपाडा प्रकल्प आम्हीच पूर्ण केला असा दावाही त्यांनी लोकार्पण सोहळ्यात केला.
धुळे शहराच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद व्हावी असा आजचा दिवस आहे. वर्षानुवर्षे धुळेकर पिण्याच्या पाण्यासाठी आठ-दहा दिवस वाट बघत होतो. ज्या धुळे शहराचे पिण्याच्या पाण्याच्या दुरवस्थेमुळे वेगळी ओळख निर्माण झाली होती, तो ठपका मिटविण्याचा हा क्षण सुवर्णाक्षरात नोंदविण्यासारखा असा दिवस आहे. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचे भाग्य मला लाभले याचा मला विशेष आनंद होत असल्याचे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास, पंचायतराज व पर्यटन मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी अक्कलपाडा येथे केले.
अक्कलपाडा येथील प्रकल्पातून १७० कोटी रुपयांच्या निधीतून साकारलेल्या धुळे शहर पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण पालकमंत्री महाजन यांच्या हस्ते झाले. येथे धरण उद्भव योजनेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला, त्यावेळी महाजन बोलत होते.
या कार्यक्रमास खासदार डॉ. सुभाष भामरे, माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल, महापौर प्रतिभाताई चौधरी, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता सुभाष भुजबळ, माजी महापौर जयश्री अहिरराव, चंद्रकात सोनार, प्रदीप कर्पे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, नगरसेवक, लोकप्रतिनिधी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री महाजन म्हणाले की, धुळे शहराचा पाणीप्रश्न शाश्वत स्वरुपात मार्गी लागावा यासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्न करीत होते. धुळेकरांना एक दिवसाआड पाणी देण्याचा दिलेला शब्द आम्ही पाळला आहे आणि वर्षानुवर्षे पाणीटंचाईमुळे त्रस्त धुळेकरांना आम्ही दिलासा दिला आहे. तसेच धुळे जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी आमचे सरकार कटीबद्ध असून, येत्या दोन वर्षात सुलवाडे-जामफळ प्रकल्प पुर्ण करणार आहोत. अक्कलपाडा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत मंत्रालयात बैठकीचे आयोजन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शहराचा विकास करायचा असेल तर मुबलक पाण्याशिवाय पर्याय नाही. धुळे शहरात यापुर्वी आठ दिवस, त्यानंतर चार दिवसांनी पाणी मिळत होते. अशा गंभीर स्थितीत धुळेकरांना झालेल्या त्रासाची कल्पनाही करवत नाही. धुळे जिल्ह्यात ज्यावेळी 2018 मध्ये महाआरोग्य शिबिराच्या निमित्ताने आलो त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुळे शहराची कायमस्वरुपी तहान भागविण्यासाठी अक्कलपाडा पाणी पुरवठा योजनेची घोषणा केली. त्यानंतर योजनेचा प्राथमिक अहवाल तयार करण्यात आला. सततच्या पाठपुराव्यामुळे योजनेचा दीडशे कोटीचा आराखडा मंजूर होऊन योजनेचे टेंडर निघाले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महत्वकांक्षी योजनेचे भूमीपूजन करण्यात आले. यासाठी खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी धुळेकरांना मुबलक पाणी मिळावे म्हणून केंद्र शासनाच्या अमृत योजनेत हा प्रकल्प समाविष्ट करून घेतला. त्यानुसार आम्ही सातत्याने पाठपुरावा करत केंद्र सरकार, राज्य सरकार व महापालिकेच्या निधीतून हे काम पूर्णत्वास नेले, अखेर ही योजना पूर्णत्वास आली असून, आता दोन दिवसाआड पाणी मिळते आहे, याचे आम्हाला अधिक समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.
ही योजना पुर्णत्वास येण्यासाठी सर्व अधिकारी, लोकप्रतिनिधी, तसेच प्रकल्पासाठी सहयोग करणारे अक्कलपाडा व परिसरातील शेतकऱ्यांनीही पाईप लाईन टाकण्यासाठी सहकार्य केले. त्यामुळेच ही 170 कोटींची योजना पुर्णत्वास आली. अक्कलपाडा प्रकल्पग्रस्तांच्या भुसंपादन, तसेच अक्कलपाडा येथील धरणात 100 टक्के पाणीसाठा कसा साठविता येईल तसेच कॅनालद्वारे शेतीला पाणी मिळण्यासाठी लवकरच मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात येईल. धुळे शहराच्या विविध विकास कामांसाठी निधीची कमतरता पडणार नाही याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. सुलवाडे-जामफळ योजनाही खान्देशातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारी योजना आहे. यासाठी एक दोन महिन्यात ई-टेंडर काढणार असून येत्या दोन वर्षांत हा प्रकल्प पुर्ण करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
हेही वाचा
खासदार डॉ. भामरे म्हणाले की, धुळेकरांना रोज आणि मुबलक पिण्याचे पाणी देण्याचा २०१९ मध्ये दिलेला शब्द आम्ही पाळला आहे आणि याचा आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून अभिमान आहे. २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योजनेचे भूमिपूजन केल्यानंतर सर्व लोकप्रतिनिधींनी हा प्रकल्प पुर्ण करण्यासाठी प्रयत्न केले. सद्यःस्थितीत अक्कलपाडा प्रकल्पात केवळ ६० टक्केच जलसाठा होत आहे. तो १०० टक्के व्हावा म्हणून प्रयत्नशील आहे. अक्कलपाडा येथील प्रकल्पाचा जलसाठा वाढविल्यास प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली जाते. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे भूसंपादन हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे. तसेच प्रकल्पाचा डावा, उजव्या पाटचाऱ्यांचा प्रश्नही सोडवावा लागणार आहे. जेणेकरून प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी मुबलक पाणी मिळेल. यासाठी जवळपास 100 कोटी रुपयांची गरज लागणार आहे. अनेर धरण व इतर प्रश्नाबाबत बैठक घेऊन पालकमंत्री म्हणून आपण यात जातीने लक्ष घालावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
आमदार जयकुमार रावल म्हणाले की, गेल्या ४० वर्षांपासून पिण्यासाठी अक्कलपाडा प्रकल्पाच्या पाण्याची वाट पाहत होतो ते पाणी आज धुळेकरांच्या घरात पोहोचले आहे. यामुळे हा सर्वांसाठी ऐतिहासिक दिवस आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे धुळ्याला आले होते. त्यावेळी त्यांनी काही योजनांचे भूमिपूजन केले होते. त्यात मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाचे भूमिपूजन केले होते. या रेल्वे मार्गासाठी वर्षानुवर्षे मागणी झाली होती. या कामास आता प्रत्यक्षात सुरवात झाली आहे. अक्कलपाडा योजना पूर्णत्वास आली असून, सुलवाडे-जामफळ योजनेचा प्रश्न होता. दरम्यानच्या काळात खंड पडला नसता तर आज या योजनेचेही लोकार्पण करता आले असते. मंत्री गिरीष महाजन, खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या माध्यमातून अनेक कामे झाली. धुळे जिल्ह्यासह लोकसभा मतदारसंघात १२०० कोटी खर्चाची कामे झाली आहेत. भविष्यात पाण्याचे मीटर लावून कोणाला किती पाणी मिळते तेही पाहिले जाईल आणि एक दिवसाआड पाणी पुरविण्याचे नियोजन होईल, असे रावल यांनी सांगितले. यावेळी महापौर प्रतिभाताई चौधरी, विजय चौधरी, अनुप अग्रवाल यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते मोदी आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना प्रातिनाधिक स्वरुपात घरकुलांची चावी देण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी, आभार प्रदर्शन हिरामण गवळी, तर सुत्रसंचलन जगदिश देवपूरकर व वाहिदअली यांनी केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते.
जिल्हा रुग्णालयात अति दक्षता व बाल अतिदक्षता विभाग सुरू
शहरातील जुन्या जिल्हा रुग्णालयात अति दक्षता, बाल अतिदक्षता विभाग व अत्याधुनिक ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन राज्याचे ग्रामविकास, पंचायतराज व पर्यटन मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार अमरीशभाई पटेल, महापौर प्रतिभाताई चौधरी, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, हिरे महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सयाजी भामरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्ता देगांवकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महेश भडांगे, माजी महापौर जयश्री अहिरराव, वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील सांगळे यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा
धुळे हे शहाराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने असंख्य रुग्ण हे जिल्हा रुग्णालयात उपचारसाठी येत असतात. तसेच भाऊसाहेब हिरे वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय हे नवीन इमारतीत स्थलांतरीत झाल्याने व सदर रुग्णालय शहरापासून 7-8 किमी अंतरावर असल्याने गोरगरीब रुग्णांना तेथे उपचारासाठी जाणे अडचणीचे होत असल्याने स्थानिक लोकप्रतीनिधींनी गोरगरिब रुग्णांना आरोग्य सेवा शहरातच मिळावी ह्या उद्देशाने शहरातच जिल्हा रुग्णालय कार्यान्वीत झाले आहे. सदर रूग्णालयात सर्व प्रकारच्या सुविधा मिळाव्यात यासाठी रुग्णालय प्रशासनामार्फत जास्तीत जास्त सेवा देणे व त्यापुढील अद्ययावत सुविधा देखील रुग्णांना मिळण्याकरिता पालकमंत्री महाजन यांनी सन 2022-23 या आर्थिक वर्षात तीन मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर व एक ॲडव्हान्स लेबर रुम तयार करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून ऑर्थोपेडीक व सेप्टीक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर तयार करण्यासाठी 3.25 कोटी, जनरल व स्त्रीरोगशास्त्र विभाग मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर तयार करणे 4.30 कोटी, नेत्रविभाग मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर तयार करणे 2.30 कोटी, प्रसुती विभागाचे आधुनिकीकरण करणेसाठी 2 कोटी असा निधी देण्यात आला. मॉड्यूलर ऑपरेशन थिएटरमुळे रुग्णांना दर्जेदार सेवा सुविधा पुरविली जाते. शस्त्रक्रियेदरम्यान जंतुसंसर्गाचा धोका अंत्यत कमी होतो. प्रतीजैवीक औषधांचा खर्च कमी होतो. रुग्णांचा मृत्यदर/विकृती कमी होतो.
जिल्हा रुग्णालय, धुळे येथे रुग्णालयीन सेवा बळकटीकरण करणे अंतर्गत ECRP मधुन 40 खाटांचे जनरल आयसीयु व 32 खाटांचे पीआयसीयु तयार करण्यात आले आहे. त्यासाठी 40 खाटांच्या आयसीयु उपकरणासाठी 3.26 कोटी, 32 खाटांच्या पीआयसीयुसाठी उपकरणासाठी 2.48 कोटी तर 40 व 32 खाटांच्या आयसीयु व पीआयसीयु मॉड्युलर करणेसाठी 3.73 कोटी निधी मंजूर केला आहे.
हेही वाचा
Comments 2