#dhule crime धुळेः एटीएम (atm) सेंटरच्या बाहेर रेकी करीत, एटीएम कार्डची अदलाबदली करुन सर्वसामान्यांचे पैसे लुबाडणार्या चार जणांच्या टोळीचा धुळे पोलिसांनी (#dhule-police) पर्दाफाश केला आहे. उल्हासनगरच्या (ullhasnagar) चार संशयितांना शिरपूर तालुक्यातील दहिवद येथे साखर कारखाना परिसरात गुरुवारी राञी पोलिसांनी पकडले.
विक्की राजु वानखेडे, भैय्यासाहेब, अनिल कडोबा वेलदोडे, वैभव महाडिक, विक्की पंडित साळवे अशी संशयितांची नावे आहेत.
शिरपूर शेतकरी साखर कारखान्याजवळ कारमध्ये काही संशयित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ, पोलीस उपनिरीक्षक भिकाजी पाटील, संदीप पाटील, हवालदार संतोष पाटील, जयेश मोरे, इसरार फारुकी, योगेश मोरे, मुकेश पावरा यांच्या पथकाने संशयितांना पकडले.
एटीएम कार्डची हेराफेरी अशी
एटीएम सेंटरमध्ये एकजण असायचा तर बाहेर थांबलेले दोन जण, कोणाकडे कोणत्या बॅंकेचे एटीएम आहे आणि पेसे काढण्यासाठी कोणाला मदतीची गरज आहे याची रेकी करायचे. एखाद्याला पैसे काढून दिल्यानंतर एटीएम परत करताना कार्डची अदलाबदली करायची आणि नंतर त्या खात्यावरील सर्व पैसे काढून पोबारा करायचा.
संशयितांकडे कार्डचा खजाना
चौघा संशयितांकडून वेगवेगळ्या बॅंकांचे तब्बल 94 एटीएम कार्ड पोलिसांनी जप्त केले आहेत. या सर्व कार्डचा वापर करुन त्यांनी राज्यात अनेकांचे पैसे लुटले आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड (sanjay barkund, sp dhule) यांनी दिली.
राज्यात 12 गुन्हे दाखल
या टोळीच्या विरोधात राज्यात ठिकठिकाणी 12 गुन्हे दाखल आहेत. त्यात भडगाव जि. जळगाव, भिवंडी, चाकण, रायगड, तुर्भे नवी मुंबई, उल्हासनगर, नेरुळ, पनवेल, ठाणे, पेल्हार येथील गुन्ह्यांचा समावेश आहे.
लाखोंचा मुद्देमाल जप्त
संशयितांकडून पोलिसांनी चार मोबाईल, नऊ हजार रुपये रोख, चार लाख रुपये किमतीची स्वीफ्ट कार असा एकूण चार लाख 48 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.