धुळे शहरातील घरपट्टी कमी करण्याचे प्रधान सचिवांचे आदेश
धुळे : शहरातील वाढीव घरपट्टीला तीव्र विरोध होत आहे. त्यामुळे आमदार फारुख शाह यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सूचनेनुसार मंगळवारी मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत वाढीव घरपट्टी कमी करण्याचे आदेश नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांनी दिले, अशी माहिती आमदार फारुख शाह यांनी प्रसारमाध्यमांना दिली. या बैठकीला आमदारांसह महापालिकेच्या आयुक्त अमिता दगडे-पाटील उपस्थित होत्या.
आमदार फारुख शाह यांच्या कार्यालयाने प्रसिध्दीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, धुळे शहर आर्थिकदृष्ट्या अतीमागास शहर असून, मोठे उद्योगधंदे नसल्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना वाढीव घरपट्टी भरणे जिकरीचे होत आहे. हद्दवाढ झाल्यामुळे शहरावर विकासकामांचा मोठा बोजा आहे. तसेच शासनाचा निधी कमी पडत असल्यामुळे शहराचा विकास होत नाही. एमआयडीसी येथे पुरेसे उद्योगधंदे नसल्यामुळे शहरातील असंख्य नागरिक बेरोजगार आहेत. शहरात यापूर्वीसुद्धा घरपट्टी वाढ करण्यात आली होती व आज सुद्धा मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून घरपट्टी वसूल केली जात आहे. परंतु ही घरपट्टी वाढ मोठ्या प्रमाणात असल्यामुळे गरीब नागरिकांना भरणे अशक्य होत आहे.
धुळेकर नागरिकांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने प्रधान सचिव नगर विकास विभाग यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आमदार फारुख शाह यांनी धुळेकरांच्या वाढीव घरपट्टीच्या प्रश्नाला वाचा फोडली आणि ही घरपट्टी कशी कमी करता येईल यासंदर्भात मुद्देनिहाय आपले म्हणणे मांडले.
मुद्दा क्रमांक एक : धुळे महानगरपालिकेने केलेल्या अवाजवी घरपट्टी वाढीमुळे शहरातील जुने बांधकाम असलेल्या मालमत्ता धारकांना मोठ्या प्रमाणात झळ पोहचणार आहे. साधारणतः 2001 ते 2002 या कालावधीत पाचशे रुपये मालमत्ता कर असणाऱ्या मालमत्ताधारकाला नवीन आकारणीनुसार पाच हजार रुपये अदा करावे लागणार आहेत. अशा प्रकारची वाढ करणे शहरातील नागरिकांच्या दृष्टीने गैरसोयीचे आणि आर्थिकदृष्ट्या न परवडणारे आहे.
मालमत्ता कराची आकारणी करण्यासाठी मनपा स्थायी समिती ठराव १२५ दिनांक ११/११/२००५ नुसार दर निश्चित करण्यात आले होते. धुळे महानगरपालिका ठराव क्रमांक ९४ दिनांक २०/०२/२०१५ अन्वये कर योग्य मूल्य २६ टक्क्यावरून ३६ टक्के करण्यास मान्यता दिली देण्यात आली होती. महानगरपालिका ठराव नंबर १९२ दिनांक २२/१२/२०२२ अन्वये विवरण पत्र क्रमांक १ मध्ये नमूद केलेल्या टक्केवारीनुसार धुळे शहर व देवपूर भागातील मालमत्तांना इमारतीच्या वयानुसार घसारा धरून कर आकारणी करण्यास मंजुरी देण्यात आली होती. महानगरपालिका ठराव नंबर १९२ दिनांक २२/१२/२०२२ मध्ये इमारतींचे पूर्वायुष्य आणि घसारा कालावधीनंतर होणारी मूल्यांची टक्केवारी बाबत नमूद आहे. ०-२० वर्षांसाठी १०० टक्के, २१-४० वर्षांसाठी ९० टकू, ४१-६० वर्षांसाठी ८० टक्के, ६१ च्यापुढे ७० टक्के या ऐवजी खालील कोष्टकाप्रमाणे आकारणी केल्यास धुळेकर नागरिकांना वाढीव घरपट्टीची झळ पोहचणार नाही.
उपरोक्त प्रमाणे आकारणी केल्यास १) मालमत्तांना घसारा न लावता केलेली आकारणी आणि घसारा लावून केलेली आकारणी यांच्यात फक्त पाच कोटींची तफावत राहील. २) नवीन मालमत्तांची आकारणी नवीन दरानेच होईल. ३) भरलेल्या रक्कमेचा परतावा द्यावा लागणार नाही. यासाठी महानगरपालिका ठराव नंबर १९२ दिनांक २२/१२/२०२२ मध्ये बदल करण्यासंदर्भात शासनाने मनपा अधिनियम १९४९ च्या ४५०अ नुसार निर्देश (direction) धुळे मनपाला द्यावेत.
मुद्दा क्रमांक दोन : धुळे महानगरपालिकेच्या वतीने मालमत्ता कर आकारण्यासाठी असलेले दरपत्रक सर्व ड वर्ग महानगरपालीकांसाठी वेगवेगळे असल्याचे निदर्शनास येते. धुळे मनपाचे दर जळगाव, चंद्रपूर, अकोला, मालेगाव मनपापेक्षा जास्त आहेत. वास्तविक धुळे सर्वार्थाने मागास असल्याने शिघ्र सिद्ध गणक नुसार येणारे दर देखील जळगाव, अहमदनगर आणि अकोलापेक्षा कमी आहेत. मनपा अधिनियम १९४९ च्या कलम ९९ आणि १२९ नुसार दर आणि कर ठरविण्याचे अधिकार मनपाला बहाल करण्यात आले आहेत. त्यामुळे मनपा प्रशासन मनमानी पद्धतीने दर आणि कराची आकारणी करीत असते. पर्यायाने दर आणि कर आकारणीवर शासनाचा कुठलाच अंकुश नाही. म्हणून महाराष्ट्रातील सर्व ड वर्ग महानगरपालिकेचे दर आणि कर सारखे करण्याबाबत मनपा अधिनियम १९४९ च्या कलम ४५० अ अन्वये निर्देश देण्यात यावे, अशी मागणी केली. त्यानुसार नगरविकास विभागाचे प्रधान सचिव गोविंद राज यांनी आमदार फारुख शाह यांनी मांडलेल्या दोन्ही मुद्यांना विचारात घेवून घरपट्टी कमी करण्यासाठी कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
या बैठकीस शंकर जाधव उपसचिव, अमिता दगडे पाटील आयुक्त धुळे मनपा, पल्लवी शिरसाट कर व मूल्य निर्धारण अधिकारी, वसुली अधीक्षक जाधव, मधुकर निकुंभे आणि नगरसेवक सलीम शाह, नासिर पठाण, सईद बेग, मुक्तार अन्सारी, युसुफ मुल्ला, आमिर पठाण, कैसर अहमद, शोएब मुल्ला, वसिम पिंजारी, शेख नूर आदी उपस्थित होते.