अयोध्येत बाबरी मशिद, राम मंदिराच्या पूर्वी तथागत गौतम बुद्धांचे मंदिर होते : रामदास आठवले
धुळे : अयोध्येत बाबरी मशिद, राम मंदिराच्या पूर्वी तथागत गौतम बुद्धांचे मंदिर होते, अशी एऐतिहासिक माहिती देत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राम मंदिराच्या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
सरकार आरएसएसच्या अजेंड्यावर चालत नाही. मोदी सरकार संविधानाच्या अजेंड्यावर चालत असल्याचा दावा करतानाच संविधान बदलण्याची हिंमत कोणामध्येच नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मंत्री आठवले हे मंगळवारी धुळे जिल्हा दौर्यावर आले होते. यावेळी धुळे शहरातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहात त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
मोदी संविधान बदलणार हा खोटा प्रचार : आठवले म्हणाले की, २०१४ मध्ये २८२, २०१९ मध्ये ३०३ तर आता २०२४ मध्ये ४०४ पेक्षा जास्त जागा लोकसभेत जिंकण्याचा आमचा म्हणजेच मोदी सरकारचा प्रयत्न आहे. देशाची जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी आहे. पंतप्रधान मोदी हे संविधान बदलण्याचा प्रयत्न करीत असल्याचा खोटा प्रचार देशात आणि राज्यात सुरु आहे. परंतु संविधान बदलण्याची हिंमत कोणामध्येच नाही. संविधान बदलण्याची आवश्यकताही नाही. संविधानामध्ये कायदे करण्याची, कायद्यात दुरुस्तीची, कायदा रद्द करण्याची तरतुद आहे. त्यामुळे संविधान बदलणे या केवळ वावड्या आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
काॅंग्रेसकडे आठवले असताना बाबासाहेब आठवले नाहीत : २६ नोव्हेंबरला संविधान दिन मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची सुरूवात मोदींनी केली. काँग्रेसला ते आठवले नाही. विशेष म्हणजे “काॅंग्रेसकडे आठवले असतानाही त्यांना आठवले नाही”, अशा मिश्किल शब्दात त्यांनी काॅंग्रेसवर टिका केली. काँग्रेसला बाबासाहेबांच्या प्रतिमेचीही आठवण झाली नाही. पंतप्रधान मोदी यांनी संसदेला संविधान सदन हे नाव दिले आहे. इंदू मिलमध्ये बाबासाहेबांचे मोठे स्मारक होत आहे.
राम मंदिराबद्दल भूमिका : या देशात हिंदु बहुसंख्य असून इतर धर्मांचे अनुयायी देखील राहतात. त्यामुळे द्वेषभावनेला कोठेही थारा नाही. मी आरपीआयसह पँथरचे काम करत असताना माझ्या अनेक बैठका मंदिराच्या सभामंडपामध्ये झालेल्या आहेत. बंधुभावाचे तत्व घटनेने सांगितले आहे. राम मंदिर हा धर्माचा विषय नाही. त्यामुळे राम मंदिराचे आमंत्रण सर्व राजकीय पक्षांसह धर्मगुरुंना दिले आहे. राम मंदिराचा प्रश्न हा प्रलंबित प्रश्न होता. मशिदीआधी तेथे मंदिर होते याचे पुरावे पुरातत्व विभागाने सुप्रिम कोर्टाला दिले. अडिच हजार वर्षांपुर्वी त्या ठिकाणी बुध्द मंदिर होते. सम्राट अशोकांनी बुध्द धम्म स्विकारल्यानंतर संपूर्ण देश बौद्ध झाला होता. त्यामुळे सर्वधर्मीयांना समान संधी देण्याची संविधानाची भुमीका आहे.
आरपीआय मोदींच्या पाठीशी : इंडिया आघाडीमध्ये पंतप्रधानपदासाठी नितीशकुमार, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी असे अनेक उमेदवार आहेत. आमच्याकडे फक्त एकच नाव आहे. ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. माझा पक्ष हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी आहे. आरपीआय हा देशभर वाढविण्याचा माझा प्रयत्न आहे. हिंदुंना विरोध करण्याची भुमीका बाबासाहेबांची कधीच नाव्हती.
लोकसभेत आरपीआयला दोन जागा द्या : आरपीआयला राज्यात लोकसभेच्या दोन जागा मिळाव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मी जरी भाजपसोबत असलो तरी त्यांचे विचार स्विकारलेले नाहीत. मणीपूरच्या घटनेवर बोलताना आठवले म्हणाले की, मणीपूरमध्ये शांतता राखण्यासाठी सरकारच्या वतीने प्रयत्न झाले आहेत. मात्र दोन्ही बाजूंनी हल्ले होत आहेत.
वंचितचे बारा वाजवणार : आठवले यांनी नव्या मोटर वाहन कायद्याचेही समर्थन केले. त्यात काही त्रृटी असतील तर त्यावर विचार होईल. वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीमध्ये नाही. वंचितचे केवळ उद्धव ठाकरेंसोबतच बोलणे झाले आहे. वंचितने प्रत्येकी १२ जागा लढविण्याचा महाविकास आघाडीला प्रस्ताव दिला आहे. वंचितचा १२ चा प्रस्ताव त्यांनी स्विकारावा म्हणजे आम्ही त्यांचे निवडणुकीत १२ वाजवू असा टोलाही आठवलेंनी लगावला.
मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची भूमिका : मराठा आंदोलनाच्या मुद्यावर आठवले म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांना आमचा पाठींबा आहे. आरक्षण देण्याची आमची भुमीका आहे. त्यामुळे जरांंगेंनी मुंबईत येवू नये. मंत्री छगन भुजबळ हे देखील ओबीसींसाठी लढत आहेत. मात्र दोघांमध्ये कोणताही वाद होवू नये, समन्वय ठेवावा. सातत्याने आरक्षणाच्या विरोधात असलेला मोठा वर्ग आरक्षणाची मागणी करीत असल्याने आनंद होत असल्याचे सांगत मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिले जाईल, अशी भुमीका देखील आठवले यांनी मांडली.
यावेळी त्यांच्यासोाबत आरपीआय जिल्हाध्यक्ष शशिकांत वाघ, संजय बैसाणे, मनीबाबा खैरनार, नयनाताई दामोदर, पंकज साळूंखे आदी उपस्थित होते.