अंडाभुर्जी अन् सोड्याच्या गाडीवर दारू पिणे पडणार महागात
धुळे : अंडाभुर्जी पावची गाडी असो की सोड्याची गाडी, त्याठिकाणी दारू पिणे आता महागात पडू शकते. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्वतः अशा प्रकारच्या गाड्यांकडे लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून सात गाड्यांवर धाडी टाकल्या असून, गुन्हे दाखल केले आहेत. रस्त्यांवर दारू पिणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांनी मोहिम तीव्र केली आहे. पांझरा नदीकाठच्या रस्त्यांवरही पोलिसांची सतत गस्त असणार आहे. या रस्त्यांवर मद्यपिंची वर्दळ वाढल्याच्या तक्रारी आहेत.
जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी अवैध व्यवसायांसह बोगस डॉक्टर, नागरिकांची फसवणूक करणार्यांवर तर कारवाई केलीच आहे. याबरोबच महत्वाच्या बंदोबस्ताला गैरहजर राहणारे आणि महामार्गावर वसुली करणार्या पोलिसांवर देखील कारवाईचा बडगा उगारला आहे. रात्री 12 ते 2 वाजेदरम्यान विशेष मोहिम राबवून प्रत्येक पोलिस ठाणे हद्दीतील दहा हिस्ट्रीशिटरची (सराईत गुन्हेगार) तपासणी करण्यात आली. या कारवाईचे धुळेकरांनी स्वागत केले आहे.
दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी दारु पिणारे, ऑमलेट व सोडा गाडयांवर दारु पिण्यासाठी जागा उपलब्ध करुन देणार्यांसह व अवैध गावठी विकणार्या एकुण 7 जणांवर कारवाई करण्यात आली. त्यात दोंडाईचा शहरात दारुचे सेवन करुन मद्यधुंद अवस्थेत सार्वजनिक ठिकाणी आरडा-ओरड करुन धिंगाणा घालणार्या गणेश आनंदा पाटील (वय 29 रा.गोविंदनगर, दोंडाईचा) याला ताब्यात घेण्यात आले. तसेच त्यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. तसेच शिरपूर शहरात कैलास बाबुराव सुर्यवंशी (वय 34 रा.भाजी मार्केट, शिरपूर) हा त्याच्या हिताक्षी ऑमलेट सेंटर हातगाडीवर लोकांकडुन पैसे घेवुन त्यांना दारु पिण्यासाठी जागा उपलब्ध करुन देतांना मिळुन आला. त्याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला. याबरोबरच नरडाणा व धुळे तालुका पोलिस ठाणे हद्दीत कारवाई करीत देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आला. तसेच थाळनेर पोलिस ठाणे हद्दीत गावठी हातभट्टीच्या दारू अड्डयावर छापा टाकत कारवाई करण्यात आली.
मोबाईल चोराला पकडले, 15 मोबाईल हस्तगत
धुळे : येथील स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या कारवाईच्या रेंजमध्ये चोरटा आला आणि एलसीबीच्या पथकाने त्याला बेड्या ठोकल्या. दोन लाखांचे महागडे पंधरा मोबाईल या चोरट्याकडून हस्तगत केले आहेत.
शहरातील अंबिका नगरातील मिसबा मशिद जवळ राहणारे मोहम्मद कमरोद्दीन मोहम्मद अजीजउल्ला कुरेशी यांच्या राहते घरातुन त्यांचा १३ हजारांचा मोबाईल अज्ञात चोरटयाने चोरुन नेला होता. दि. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ही घटना घडली होती. याप्रकरणी चाळीसगांव रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच शहरात मोबाईल चोरीचे प्रमाण मोठया प्रमाणात असल्याने पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे व अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी विशेष लक्ष घालुन मोबाईल चोरी करणार्या गुन्हेगांराचा शोध घेण्याच्या सुचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना दिल्या. त्यानुसार पीआय शिंदे यांनी विशेष मोहीम राबवुन मिळालेल्या माहितीच्या आधारे कबिर युसुफ काझी (रा. चाळीसगांव रोड, गजानन कॉलनी, धुळे) याला अटक केली. त्याच्याकडून गुन्हयातील चोरीस गेलेला मोबाईल व इतर चोरलेले एकुण १५ मोबाईल जप्त करण्यात आले. तसेच चाळीसगाव रोड पोलिसात दाखल मोबाईल चोरीच्या गुन्हा उघडकीस आणला.
ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोसई प्रकाश पाटील, असई शाम निकम, पोहेकॉ सुरेश भालेराव, पंकज खैरमोडे, पोना रविकिरण राठोड, पोकॉ गुणवंत पाटील, सुशिल शेंडे, निलेश पोतदार, अमोल जाधव यांच्या पथकाने केली आहे.