शासनाचा वाळू डेपो सुरू, 600 रुपये ब्रासने मिळणार वाळू
धुळे : जिल्ह्यात शासनाचा वाळू डेपो सुरू झाला असून, आता शासनाच्या धोरणानुसार 600 रुपये ब्रास वाळू मिळणार आहे. गरजू नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने मागणी नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे.
शासनाचे धोरण असे : शासन निर्णय क्र. गोखनि-10/122/प्र. क्र. 82/ख-1 दिनांक 19 एप्रिल 2023 च्या शासन निर्णयानुसार शासनामार्फत वाळू/रेतीचे उत्खनन, साठवणूक व ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री याबाबतचे सर्वंकष धोरण जाहीर करण्यात आले आहे. सदर नवीन वाळू धोरणानुसार नागरिकांना 600 रुपये प्रमाणे प्रती ब्रास वाळूचा दर निश्चित करण्यात आला आहे. डेपोपासून वाळू वाहतुकीचा खर्च हा नागरिकांना स्वतः करावा लागेल.
एका कुटुंबाला किती वाळू मिळणार? : एका कुटुंबाला 50 मेट्रीक टन वाळू/रेती घेता येईल. पुन्हा वाळू हवी असल्यास वाळू मिळाल्याच्या दिनांकापासून एक महिन्यानंतर पुन्हा वाळूची मागणी करावी लागेल. मागणी नोंदविल्याच्या पंधरा दिवसांच्या आत डेपोतून वाळू उचल करणे बंधनकारक राहील, असे प्रशासनाने कळविले आहे.
या डेपोवरून उचलावी लागेल वाळू : जिल्ह्यात मौजे अक्कडसे ता. शिंदखेडा येथे वाळू डेपो कार्यान्वित झाला आहे. सदर वाळू डेपोमधून नागरिकांनी शासनाच्या वाळू धोरणानुसार वाळू उचल करावी, असे आवाहन अभिनव गोयल, जिल्हाधिकारी, धुळे यांनी केले आहे.
ऑनलाईन मागणी कशी नोंदवाल? : शासकीय किमतीनुसार वाळू डेपोतून वाळू घेण्याकरिता आधार क्रमांक अनिवार्य आहे. ग्राहकांना वाळू हवी असल्यास ‘महाखनिज’ प्रणालीवर वाळू खरेदी मागणीची नोंद करणे आवश्यक राहील. सेतू केंद्रामार्फत ग्राहक वाळूची नोंद करू शकतील.
हेही वाचा