महाराष्ट्रातून ४५ प्लस खासदार निवडीचा महायुतीचा संकल्प
धुळे : लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष- शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तसेच अन्य १५ घटक पक्षांच्या महायुतीचा रविवारी (ता. १४) सकाळी अकराला येथील पांझरा नदीकाठावरील अग्रवाल विश्राम भवनात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत महामेळावा होत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील लोकसभेच्या ४८ पैकी ४५ हून अधिक जागांवर महायुतीचे खासदार निवडून आणत नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान करण्याचा संकल्प महायुतीतर्फे करण्यात आला आहे. या संकल्प सिद्धीसाठी हा मेळावा होत असल्याची माहिती खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी आज येथे दिली.
महायुतीच्या रविवारी होणाऱ्या मेळाव्यासंदर्भात आज खासदार डॉ. भामरे यांच्या पारोळा रोडवरील संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद झाली, तीत डॉ. भामरे बोलत होते. साक्रीच्या आमदार मंजुळाताई गावित, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) बबनराव चौधरी, महायुतीचे भाजपचे समन्वयक अनुप अग्रवाल, शिवसेनेचे समन्वयक प्रसाद ढोमसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे समन्वयक किरण शिंदे, आरपीआयचे (ओगले गट) ॲड. महेंद्र निळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश सोनवणे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सतीश महाले, मनोज मोरे, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, भाजप महिला मोर्चाच्या उत्तर महाराष्ट्र प्रमुख जयश्रीताई अहिरराव, संजय गुजराथी, आरपीआयचे शशिकांत वाघ, नगरसेविका भारती माळी, किरण सिंघवी, प्रा. अरविंद जाधव, राम भदाणे, यशवंत येवलेकर, संदीप बैसाणे, चेतन मंडोरे, संजय वाल्हे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कैलास चौधरी आदी उपस्थित होते.
खासदार डॉ. भामरे म्हणाले, की लोकसभेच्या आगामी निवडणुकीत पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना विराजमान करण्यासह महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ पैकी ४५ हून अधिक जागांवर भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेससह १५ घटक पक्षांचा समावेश असलेले महायुतीचे उमेदवार निवडून आणण्याचा संकल्प प्रदेश स्तरावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पक्षाच्या राज्यस्तरीय नेत्यांनी केला आहे. हा संकल्प तडीस नेण्यासाठी महायुतीत समाविष्ट सर्वच पक्षांच्या जिल्हास्तरीय पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते व बूथस्तरीय पदाधिकाऱ्यांचा महामेळावा संपूर्ण राज्यात उद्या (ता. १४) एकाच दिवशी व एकाच वेळी होत आहे. या महामेळाव्यात आपापसांतील सर्व मतभेद बाजूला ठेवत एकदिलाने महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी केलेला संकल्प पूर्ण करण्याचा निश्चय करण्यात आला आहे. त्यानुसार उद्या हा महामेळावा होत आहे. या मेळाव्यात केंद्र सरकारसह राज्य सरकारतर्फे जिल्ह्यात झालेल्या विविध विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे नियोजन करण्यात येईल. तसेच महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे ध्येय प्राप्त करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाईल.
भाजपचे समन्वयक अनुप अग्रवाल म्हणाले, की लोकसभा निवडणुकीनंतरही भविष्यात ही महायुती कायम राहणार असून, त्याबाबतची जबाबदारी समन्वयकांवर सोपविण्यात आली आहे. तसेच महायुतीतील सर्वच पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रत्येक गोष्टीचे बारीक नियोजन करत अंमलबजावणी केली जाईल. शिवसेनेचे समन्वयक श्री. ढोमसे म्हणाले, की उद्या प्रत्येक जिल्ह्यात असे मेळावे होत असून, जिल्हास्तरावरही व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे. असेच नियोजन यापुढे तालुका व बूथस्तरावरही केले जाईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे समन्वयक किरण शिंदे म्हणाले, की लोकसभा निवडणुकीत राज्यातून ४५ हून अधिक महायुतीचे उमेदवार निवडून देण्यासाठी सर्वच पक्षांनी एकत्रित व मनापासून काम करावयाचे आहे. महायुती ठरवेल त्या उमेदवाराच्या विजयासाठी सर्वच पक्षांतर्फे प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाईल. भाजपचे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी म्हणाले, की उद्याचा मेळावा यशस्वी करण्याचे नियोजन झाले आहे. हा मेळावा सुरवात असून, यापुढे विधानसभा मतदारसंघनिहाय तसेच बूथस्तरीय महायुतीचे मेळावे, बैठका होतील. आरपीआयचे ॲड. निळे म्हणाले, की या मेळाव्याच्या माध्यमातून महायुतीत समाविष्ट सर्वच १५ घटक पक्षांतील मतभेद बाजूला सारून त्यांच्यात मनोमीलन करण्यात येईल. तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनाही एकत्र बसवून केंद्र व प्रदेश स्तरावर महायुतीने ठरविलेल्या उमेदवाराच्या विजयाचे नियोजन केले जाईल.