रॅगिंग हा संविधानिकदृष्ट्या गुन्हा! समाजकार्य महाविद्यालयात ॲंटी रॅगिंग कार्यक्रम
धुळे : रॅगिंग हा संविधानिकदृष्ट्या गुन्हा असून, रॅगिंगमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य उध्वस्त होऊ शकते. त्यामुळे विविध महाविद्यालयांमधून रॅगिंग हद्दपार होणे गरजेचे आहे. रॅगिंगसारख्या प्रकारांना विद्यार्थ्यांनी आळा घालावा असे आवाहन समाजकार्य महाविद्यालयात झालेल्या ॲंटी रॅगिंग कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आले.
समता शिक्षण संस्था पुणे संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविदयालय मोराणे, धुळे आणि गायत्री सोशल ॲण्ड वेल्फेअर संस्था धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने 13 जानेवारी रोजी अँटी रॅगिंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. रघुनाथ महाजन, प्रमुख पाहुणे ॲड. चंद्रकांत येशीराव, प्रमुख मार्गदर्शक ॲड. धनश्री येशीराव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
समाजकार्य महाविद्यालयातील अँटी रॅगिंग समितीच्या समन्वयक प्रा. डॉ. सुवर्णा बर्डे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना रॅगिंग संदर्भातील संविधानिक तरतूदीची माहिती दिली. ॲड. धनश्री येशीराव यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, रॅगिंग हा संविधानिकदृष्ट्या गुन्हा आहे. रॅगिंग संदर्भातील कायद्याचीही त्यांनी सविस्तर माहिती दिली. ॲड. चंद्रकांत येशीराव यांनी भारतीय दंड संहिता 1860 या कायद्याचा उल्लेख करीत रॅगिंगच्या सत्य घटना सांगून रॅगिंगच्या दुष्परिणामांबद्दल विद्यार्थ्यांमध्ये प्रबोधन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयांमध्ये रॅगिंगचे प्रकार होऊ द्यायचे नाहीत, असे आवाहनही त्यांनी केले. तर प्रा. डॉ. रघुनाथ महाजन यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, समाजकार्य महाविद्यालयामध्ये रॅगिंगचे प्रकार नाहीत. अनेक महाविद्यालयांमधून आता रॅगिंग हद्दपार झाली असल्याचे सकारात्मक विचार त्यांनी मांडले.
दरम्यान, बीएसडब्लू प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी अँटी रॅगिंगसंदर्भात तयार केलेल्या जनजागृती पोस्टर्सचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. याबद्दल विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. त्यात लिलिमा महाजन, प्रमिला पावरा, कोमल शिंदे, तेजस्विनी धनगर, रोशनी वाघ, तेजस्वी पिवाल या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. अक्षय आणि त्यांचा ग्रुपने रॅगिंगवर आधारित पथनाट्य सादर केले. त्यांचा देखील महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. श्यामसिंग वळवी यांनी आभार मानले. तरकोमल शिंदे, तेजस्विनी धनगर या विद्यार्थिनींनी सूत्रसंचालन केले.