बालविवाह, सोशल मीडियाचे दुष्परिणामांवर स्नेहसंमेलनातून जनजागृती
धुळे : येथील इंदुबाई भदाणे प्रतिष्ठान संचलित, मोराने प्र. नेर (ता. धुळे) येथील श्री छत्रपती शिवाजी सैनिकी विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांनी नाटीकेतून बालविवाह, सोशल मीडियाचे दुष्परिणामांवर जनजागृती केली. तसेच नृत्य, कलाविष्कार सादर केले. विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना पाहुण्यांनी भरभरून दाद दिली.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून साक्री विधानसभा मतदार संघाच्या आमदार मंजुळाताई गावीत उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब भदाणे होते. यावेळी संस्थेच्या सचिव तथा जिल्हा परिषद सदस्या शालिनीताई बाळासाहेब भदाणे, शंकरराव खलाणे, मोराने येथील अभिजित ठाकरे शैक्षणिक संस्थेचे संचालक मयुर ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते संजय कपूर, एस. पी. पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तत्पूर्वी विद्यार्थ्यांनी पथसंचलन करून प्रमुख पाहुण्याना मानवंदना दिली. त्यानंतर स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यात विद्यार्थ्यांनी ऱ्ह्याइम्स, मासपीटी, भारतीयम, लेझीम, बांबू डान्स सादर केले. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. यात विद्यार्थ्यांनी नृत्य, ड्रामा, अभिनय पर कार्यक्रम सादर केले .सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी बालविवाह, सोशल मीडियाचे दुष्परिणाम, मंगळागौर, शिवजन्मोत्सव यासारखे समाज जनजागृतीपर कार्यक्रम सादर केले. यानंतर शाळेतील वर्षभरात घेतले जाणारे शैक्षणिक उपक्रम तसेच मैदानी खेळात विशेष प्राविण्य मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आ. मंजुळाताई गावित यांनी विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या कलागुणांना दाद दिली. तसेच त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना प्रोत्साहन देऊन त्यांचे मनोबल वाढवले. सांस्कृतिक कार्यक्रमातून आपण आपल्या संस्कृती, रुढी, परंपरा जोपासत असतो. त्यातूनच आपण आपला व आपल्या समाजाचा, धर्माचा तसेच आपल्या देशाचा विकास करत असतो, असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब भदाणे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शाळेतील विद्यार्थी घेत असलेल्या परिश्रमाचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, आम्ही आमच्या शाळेत शैक्षणिक तसेच क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना नेहमी प्रोत्साहित करत असतो व त्यातून या मुलांचा शारीरिक व मानसिक विकास घडवित असतो.
संस्थेच्या सचिव शालिनीताई भदाणे यांनी विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या विविध गुणांचे व कौशल्यांचे विशेष कौतुक केले. शाळेचे प्राचार्य एस. बी. बेहेरे यांनी शाळेमध्ये वर्षभरात घेतले जाणारे कार्यक्रम व विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका व्ही. एस. बेहेरे, एस. पी. पाटील व मिताली पारधी, स्नेहा पावरा, कोमल पवार, प्रतीक्षा साबळे, रत्नदीप सोनवणे व अधिराज पाटील या विद्यार्थ्यांनी केले. तर आभार उपप्राचार्य के. के. बाविस्कर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.