बोरी नदी पट्ट्यातील गावागावांमध्ये ३० कोटींतून रस्त्यांची कामे मंजूर
धुळे : धुळे ग्रामीणमधील बोरी नदी पट्ट्यातील विविध गावांमध्ये पंतप्रधान ग्रामसडक योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, नाबार्ड व राज्याच्या अर्थसंकल्पात तरतुदीतून सुमारे ३० कोटींच्या निधीतून रस्त्यांची विविध कामे मंजूर झाली आहेत. यातील काही कामे सुरू आहेत, तर काही कामे लवकरच सुरू होतील. यामुळे बोरी नदीपट्ट्यातील शेतीला बारमाही पाण्यासह रस्त्यांचे जाळेही निर्माण केले जात आहे. यातून शेतकऱ्यांसह ग्रामीण भागातील ग्रामस्थांची दळणवळणाची मोठी सोय होईल, अशी आशा खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी व्यक्त केली.
पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत विंचूर (ता. धुळे) येथे राज्यमार्ग १७ ते दोंदवाड ते विंचूर ते शिरूडदरम्यान खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रयत्नाने चार कोटी ४२ लाख ६२ हजार रुपये निधीतून मंजूर झालेल्या रस्त्याचे तसेच १० कोटी ८८ हजार रुपयांच्या निधीतून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत मंजूर झालेल्या शिरूड-धामणगाव-निमगूळ-बाबरे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आणि बोरी नदीवरील नाबार्डच्या साडेचार कोटी रुपयांच्या निधीतून बांधण्यात आलेल्या निमगूळ येथील पुलाचे उद्घाटन रविवारी (ता. १४) खासदार डॉ. भामरे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खरेदी- विक्री संघाचे माजी अध्यक्ष विजय गजानन पाटील, बोरकुंडचे माजी लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब भदाणे, जिल्हा परिषद सदस्य आशुतोष पाटील, सुधीर जाधव, राम भदाणे, प्रभाकर भदाणे, भाजपच्या उद्योग आघाडीचे प्रदेश सहसंयोजक उत्कर्ष पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब देसले, तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील, तालुका सरचिटणीस शरद पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती विद्याधर पाटील, सीएमजेएसवायचे अभियंता व्ही. एम. पाटील, बोधगावचे सरपंच अविनाश पाटील, खोरदडचे सरपंच शरद पाटील, नानाभाऊ पाटील, भटू पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
उद्योगवाढीसाठी इन्फ्रास्ट्रक्चरची उभारणी : विंचूर येथे खासदार डॉ. भामरे यांच्या प्रयत्नाने पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत चार कोटी ४२ लाखांच्या निधीतून मंजूर झालेल्या राज्य मार्ग १७ ते दोंदवाड-विंचूर-शिरूड या रस्त्याचे भूमिपूजन डॉ. भामरे यांच्या हस्ते झाले. ते म्हणाले, की धुळे ग्रामीणमधील बोरी परिसरात वर्षानुवर्षे शेतीसह पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते. तसेच रस्त्यांचे प्रश्नही प्रलंबित होते. या पार्श्वभूमीवर गेल्या सहा महिन्यांत मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, पंतप्रधान ग्रामसडक योजना, नाबार्ड व राज्याच्या अर्थसंकल्पीय निधीतून तालुक्यातील विविध गावांत १२० कोटी रुपये निधीतून रस्त्यांची कामे मंजूर केली. आता या कामांचे भूमिपूजन होत असून, लवकरच ती पूर्णत्वास जातील. दुसरीकडे सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजनेचे पाणीही वर्ष- दीड वर्षात बोरी परिसरातील गावागावांतील शेतीसाठी मिळे. यातून बोरी परिसरातील विकासाचा अनुशेष भरून काढण्याची संधी मला मिळत आहे. याच बरोबर धुळे तालुक्यात पाच राष्ट्रीय महामार्गांचे जाळे विणले गेले आहे. याशिवाय मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्गांतर्गत पहिल्या टप्प्यातील धुळे ते नरडाणा या मार्गाच्या कामाची निविदाही एका कंपनीला नुकतीच देण्यात आली असून, आठवडाभरात हे काम सुरू होईल. यातून येत्या दोन-तीन वर्षांत जिल्ह्यातील नरडाणा व धुळे शहर औद्योगिक वसाहतींमध्ये उद्योगांची भरभराट होऊन बेरोजगारांच्या हातांनाही काम मिळेल, असा आशावादही खासदार डॉ. भामरे यांनी व्यक्त केला.
खासदार डॉ. भामरेंमुळे रस्त्यांना निधी : बाळासाहेब भदाणे म्हणाले, की दोंदवाड-विंचूर-शिरूड हा रस्ता राज्य मार्ग १७ ला जोडणारा महत्त्वाचा रस्ता ठरेल. तिन्ही गावांतील शेतकरी, ग्रामस्थांना दळणवळणासाठी तो उपयुक्त ठरणार आहे. बोरी पट्ट्यातील बोरकुंड-रतनपुरा गटातील रस्त्यांची सर्वच कामे पूर्ण झाली आहेत. तसेच तरवाडे-मोरदड हा आठ कोटींच्या निधीतून रस्त्याचे काम मार्गी लागले आहे. आर्वी-शिरूड रस्त्यावरील बोरकुंड ते शिरूडदरम्यान खराब रस्त्याच्या दुरुस्तीसाठीही ८ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. महिनाभरात निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन काम सुरू होईल. यात खासदार डॉ. भामरे यांच्या प्रयत्नांमुळे बोरी पट्ट्यात २४ कोटींची कामे मंजूर आहेत. विकासासाठी निधी आणणारे एकीकडे आणि या कामांचे श्रेय घेणारे दुसरेच अशी स्थिती आहे.
आमदारांनी फुकटचे श्रेय घेऊ नये : आशुतोष पाटील : शिरूड येथे झालेल्या कार्यक्रमात शिरूड ते धामणगाव-निमगूळ—बाबरे या रस्त्यासह गटातील विविध कामांसाठी खासदार डॉ. भामरे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याबाबत जिल्हा परिषद सदस्य आशुतोष पाटील यांनी माहिती दिली. ते म्हणाले, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला शिरूड-धामणगाव-वणी- निमगूळ- बाबरे या रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा दोनअंतर्गत आशियाई विकास बँकेच्या अर्थसहाय्यातून तब्बल १० कोटी ८८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या रस्त्याअंतर्गत १३ किलोमीटर डांबरीकरण व १७ पाईप मोऱ्यांचे काम होणार आहे. राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता असून, पालकमंत्री गिरीश महाजन व खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून निधी मंजूर करून आणला. यामुळे निमगूळसह परिसरातील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी परस्पर या कामाचे भूमिपूजन करून फुकटचे श्रेय घेऊ नये, असेही जिल्हा परिषद सदस्य आशुतोष पाटील यांनी ठणकावले.