‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ऐतिहासिक धुळे भेट : एक वास्तव’
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर न्यायालयीन कामकाजानिमित्त 31 जुलै 1937 आणि 17, 18, 19 जून 1938 रोजी धुळ्यात आले होते. आंबेडकरी चळवळीतील युवा नेतृत्व आनंद सैंदाणे यांनी बाबासाहेबांच्या ऐतिहासिक धुळे भेटीचे दस्तावेज संकलित केले. बाबासाहेबांनी खान्देशात विविध ठिकाणी भेट देत समाजप्रबोधन करण्याचा संदेश आपल्या अनुयायांना दिल्याचे पुरावेही त्यांना मिळाले. बाबासाहेबांच्या या ऐतिहासिक कार्याच्या आठवणींना कायमस्वरूपी उजाळा मिळत राहिला तर आंबेडकरी चळवळ बळकट होण्यास मदतच होईल, हे ओळखून बाबासाहेबांनी ज्या ट्रॅव्हलर्स बंगल्यात मुक्काम केला होता, त्या बंगल्याला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याची मागणी आहे. या मागणीच्या पाठपुराव्यासाठी आनंद सैंदाणे यांनी या ऐतिहासिक बंगल्याला ‘संदेश भूमी’ असे नाव दिले. तसेच संदेश भूमी संरक्षण आणि संवर्धन समितीची स्थापनाही केली. संदेश भूमी येथे बाबासाहेबांचा अर्धाकृती पुतळा आणि ग्रंथालय उभारून याठिकाणी शिक्षण तसेच प्रबोधनाचे कार्य अविरतपणे सुरू आहे. महाराष्ट्रातील खान्देश आणि विशेष करून धुळे शहराशी बाबासाहेबांचा असलेला वारसा जगाला माहित व्हावा याकरिता आनंद सैंदाणे यांनी एक पुस्तकही लिहिले आहे. संदेश भूमी राष्ट्रीय स्मारकाच्या चळवळीत खारीचा वाटा म्हणून आम्ही,
आनंद जयराम सैंदाणे लिखित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ऐतिहासिक धुळे भेट : एक वास्तव’ या पुस्तकाची लेखमाला प्रत्येक रविवारी प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. या लेखमालेचा पहिला भाग रविवार दि. 21 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध होत आहे. आपण या लेखमालेला भरभरून प्रतिसाद द्याल, ही अपेक्षा..!
संपादक/संचालक