श्रीराम मंदिर सभागृहाचे आ. कुणाल पाटील यांच्या हस्ते भूमीपुजन
धुळे : आयोध्या येथे होणार्या श्रीराम प्रभूंच्या प्राणप्रतिष्ठेचे शुभ मुर्हूत साधत धुळे तालुक्यातील शिरधाणे प्र. नेर येथे श्रीराम प्रभूंच्या जय घोषात आणि समस्त रामभक्तांच्या साक्षीने आ. कुणाल पाटील यांच्या आमदार निधीतून श्रीराम मंदिर सभागृहाच्या बांधकामास प्रारंभ करण्यात आला. यावेळी आ. कुणाल पाटील हे ज्ञानोबा भजनी मंडळ आणि शिरधाणे ग्रामस्थांसोबत रामभजनात एकरुप झाले.
मर्यादा पुरुषोत्तम प्रभु रामचंद्रांची आयोध्येत प्राणप्रतिष्ठा केली जात आहे. या पावन पर्वावर सोमवार दि. 22 जानेवारी रोजी आ. कुणाल पाटील यांच्या हस्ते शिरधाणे प्र. नेर येथे सुमारे पाचशे वर्ष पुरातन असलेल्या श्रीराममंदिरासाठी सभागृहाचे भूमीपुजन करण्यात आले. राममंदिरासाठी सभागृह व्हावे अशी ग्रामस्थांची इच्छा होती. त्याअनुषंगाने आ. कुणाल पाटील यांच्या हस्ते विधीवत पुजा करुन कामास प्रारंभ झाला. या कामासाठी आ. कुणाल पाटील यांनी आपल्या आमदार निधीतून १५ लक्ष रुपयाचा निधी दिला आहे.
दरम्यान, ज्ञानोबा भजनी मंडळाने गावातून रामभजन गात दिंडी काढली होती. या दिंडीत आ. कुणाल पाटील सहभागी झाले. यावेळी आ. पाटील हे राम भजनात एकरुप झाले.
याप्रसंगी नेर जि. प. सदस्य आनंद पाटील, खंडलाय माजी सरपंच पी. एन. पाटील, बांबुर्ले माजी सरपंच पुंडलिक पाटील, बापू खताळ, डॉ. बोढरे यांच्यासह शिरडाणे येथील पं. स. माजी उपसभापती, आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी, सेवा सोसायटी पदाधिकारी, ज्ञानोबा भजनी मंडळ आणि गावातील तरुण मंडळ उपस्थित होते.