अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे देशभरात दिवाळी
अयोध्या : श्रीराम मंदिरात प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होताच देशभरात दिवाळी साजरी झाली. लाखो भाविकांच्या उपस्थितीत झालेल्या या ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. देशभरातील जनतेला घरबसल्या रामलल्लाच्या मूर्तीचे दर्शन घेता आले.
प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल गर्भगृहात उपस्थित होते.
या कार्यक्रमाला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. यात राजकीय नेत्यांसोबतच सामाजिक, क्रीडा, कला आणि अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश होता.
गणेश पूजनाने या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात झाली. त्यानंतर बारा वाजून 29 मिनिटांनी हा प्राणप्रतिष्ठा विधी संपन्न झाला. 84 सेकंदांच्या अभिजात सूक्ष्म मुहूर्तावर हा विधी झाला. प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर हेलिकॉप्टरच्या साह्याने अयोध्येतील राम मंदिरावर पुष्पवर्षाव करण्यात आला.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे भाषण
श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या भव्य सोहळ्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रामायणातील पात्रांचा उल्लेख करत देशातील युवकांना आवाहन केले. श्री रामाचे भव्य मंदिर तर तयार झाले, आता पुढे काय? आज या पवित्र वेळी आपण पुढील हजार वर्षांची पायाभरणी केली आहे. मोदींनी आपल्या भाषणात शबरी, निषादराज, खार आणि जटायू यांची उदाहरणे दिली. श्रीरामांचे भव्य मंदिर तर झाले आता पुढे काय? असा सलाव उपस्थित करत एक संकल्प मांडला. राम मंदिर निर्मितीच्या पुढे जाऊन आपण एक समर्थ, भव्य आणि दिव्य भारत निर्मितीची शपथ घेऊया, असे आवाहन मोदींनी केले.
मोदी पुढे म्हणाले, या शुभ दिनी आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी ज्या दैवी शक्ती आणि आत्मे उपस्थित आहेत, त्या आपल्याला असेच निरोप देतील का? कदापी नाही. आज मी मनापासून अनुभवतोय की, कालचक्र बदलत आहे. हा एक संयोग आहे. कालचक्राने या मंदिर निर्मितीसाठी आपल्या पिढीची निवड केली आहे. त्यामुळेच मी म्हणतोय की, हीच वेळ आहे, हीच योग्य वेळ आहे. श्री रामाचे विचार सोबत घेऊन, राष्ट्रनिर्मिती करण्याची शपथ घेऊयात.आजच्या युगाची मागणी आहे की आपण आपल्या विवेकाचा विस्तार केला पाहिजे. हनुमानजींची सेवा, गुण, समर्पण. हे असे गुण आहेत जे बाहेरून शोधावे लागत नाहीत. हे गुणच एक भव्य आणि दिव्य भारताचा आधार बनेल. ही दिव्य भारताची निर्मिती आहे. दुर्गम झोपडीत राहणारी आई शबरीची अनुभूती येते. ती खूप दिवसांपासून म्हणत होती की राम येणार. हा विश्वास प्रत्येक भारतीयात जन्माला येतो. ते म्हणाले की, हा देवापासून देश आणि रामापासून राष्ट्राच्या चैतन्याचा विस्तार आहे. आज देशात निराशेला थोडी जागाही नाही. जे स्वतःला सामान्य आणि लहान समजतात त्यांनी खारचे योगदान लक्षात ठेवावे.
पीएम मोदी म्हणाले की, लंकापती रावण अत्यंत शक्तिशाली आणि ज्ञानी होता. पण जटायू पहा, तो बलाढ्य रावणाशी लढला. तो रावणाचा पराभव करू शकणार नाही हे त्याला माहीत होते. पण तरीही त्याने त्याचा सामना केला. अहंकारातून उठून स्वतःचा विचार केला पाहिजे. शतकानुशतकांच्या प्रतीक्षेनंतर आपण सगळे इथपर्यंत पोहोचलो आहोत. आता आम्ही थांबणार नाही.
शेवटी ते म्हणाले की, मी देशातील तरुणांना आवाहन करू इच्छितो की अशी वेळ आणि योगायोग पुन्हा होणार नाही. आता आम्हाला चुकण्याची गरज नाही. परंपरा आणि आधुनिकता सोबत घेऊन पुढे जायचे आहे. हे भव्य राम मंदिर भव्य भारताच्या प्रगतीचे साक्षीदार असेल. सामूहिक प्रयत्नातून ध्येयाचा जन्म झाला तर वेळ लागणार नाही. रामललाच्या चरणी शरण जाऊन मी माझे बोलणे संपवतो. जय सियावर रामचंद्र!