डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मिळालेली वाघाडी ता. शिरपूर येथील बैलपोळ्याची केस
डॉ. बाबासाहेब आंबेडकर दि. ३१ जुलै १९३७ रोजी कोर्टाच्या कामानिमित्त धुळ्यात येऊन गेल्याचा इतिहास आहे. मात्र बऱ्याच लोकांना हे माहीत नाही की, बाबासाहेब कुठल्या केस संदर्भात आले होते? केस कुणाची होती, कुठली होती? कोणाविरुद्ध आणि का होती? याविषयी लोकांकडे सविस्तर व सत्य माहिती नाही. म्हणून लोकांना सत्य इतिहास कळावा याकरिता हा प्रपंच…
प्रारंभी जसे म्हटले की, दि. ३१ जुलै १९३७ रोजी कोर्टाच्या कामानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर धुळ्यात आले. मात्र या केसचा पूर्व इतिहास आपणासमोर मांडणे गरजेचे आहे. मोगल काळापासून नंतर छत्रपती शिवाजी महाराज, पेशवे काळात पाटीलकी (जहागिरी) बहाल करण्यात आलेल्या होत्या. ब्रिटीश काळात देखील या पाटीलकी, जहागिरी, देशमुखी जशाच्या तशाच होत्या. असे सांगितले जाते की, पार्वताबाई चंद्रराव पवार यांनी विशेष कामगिरी केल्यामुळे १८०८ मध्ये त्यांना पेशव्यांनी पाच गावांची सनद बहाल केली होती. ती पाच गावे अशी : वाडी, वाघाडी, अर्थे, नांदर्डे आणि सांगवी. या पाच गावांची ९०० एकरची पाटीलकी पार्वताबाई यांना मिळाली होती. पार्वताबाईंनी कोणती मोठी कामगिरी केली होती हे मात्र त्यांच्या आताच्या नातेवाईकांना नीटपणे सांगता येत नाही व त्याबद्दलचे कुठलेच दस्तावेज त्यांच्याकडे उपलब्ध नाहीत. पार्वताबाईस मुलबाळ नव्हते. त्यामुळे सर्व संपत्तीला वारसदार म्हणून त्यांनी त्यांच्या भैरव परिवाराकडून एक मुलगा दत्तक घेतला. मोतीराम असे त्या मुलाचे नाव होते. मोतीराम मोठा झाला. त्याचे लग्न झाले. त्याला एक मुलगा, दोन मुली होत्या. त्यानंतर मोतीरामने दुसरे लग्न केले. दुसऱ्या पत्नीपासून देखील चार मुले झाली. पहिल्या पत्नीपासुन हुलेसिंग, चंद्रभागा आणि दुर्गाबाई; तर दुसऱ्या पत्नीपासुन जुळे भाऊ यशवंतराव आणि उत्तमराव, शांताबाई,
वत्सलाबाई अशी ती सात भावंडे होती. मोतीरामानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी मोठा मुलगा हुलेसिंग याच्यावर आली. ९०० एकर जमिनीचा संपूर्ण कारभार हुलेसिंग मोतीराम पाटील (पवार, जहागिरदार) हे पहात होते.
ग्रामीण भागात पोळा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. गावात उत्साहाचे वातावरण असते. शेतकरी वर्षातून एकदा आपल्या शेतात राबणाऱ्या बैलांना एक दिवस विश्रांती देतो. सायंकाळी बैलांना सजवून संपूर्ण गावात मिरवणूक काढली जाते. गावाच्या वेशीवरील मंदिरात नारळ फोडून मग बैल आपल्या घरी आणतो. घरातील महिला बैलांची पंचारती ओवाळून पुजा करतात व धान्य खाण्यास देतात. वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या प्रथा असतात. तशीच शिरपूर तालुक्यातील वाघाडी या गावातील प्रथा काही वेगळीच होती. गावातील सर्व बैलजोड्या पोळ्याच्या दिवशी देवीच्या मंदीराजवळ येतात. जहागिरदारांच्या बैलजोड्या देखील त्या देवीच्या मंदीराजवळ येतात. ब्राह्मण सर्वप्रथम जहागिरदारांच्या बैलाची पुजा करतात मग जहागिरदारांच्या दोन बैलांना बाशिंग बांधून वाजत-गाजत मिरवणुक निघते. बाशिंग बांधलेले दोन बैल पुढे चालतात व बाकी गावकऱ्यांचे बैल त्यांच्यामागे चालत असतात. वाजत-गाजत मिरवणुक गावदरवाजापर्यंत येते. मग जो तो आपआपले बैल घरी घेऊन जातो.
दरम्यान, अचानक त्या गावात १९२५ साली मगन मथुरादास वाणी व अन्य १४ लोकांनी या प्रथेला फाटा देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हुलेसिंग मोतीराम जहागिरदार (पवार, पाटील) यांनी दि. २७ जुलै १९३६ रोजी अर्ज केला की, माझ्या गावात पोळ्याच्या सणानिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत कुळवहीवाटीप्रमाणे माझे बैल सर्वात पुढे ठेवण्याबाबत अर्ज मा. प्रांत अधिकारी (इं. डी) यांच्याकडे केला. त्या अर्जाची सुनावणी दिनांक २९ जुलै १९३६ रोजी मा. प्रांत अधिकारी यांनी नामंजुर केल्याने अर्जदार हुलेसिंग मोतीराम पाटील (पवार, जहागिरदार) यांनी मा. जिल्हा न्यायदंडाधिकारी साहेब (पं. खा.) धुळे यांचेकडे अर्ज केला. त्या अर्जाच्या सुनावणीकरिता कोणत्या वकीलास बोलवावे असा विचार जहागिरदार यांचे वकील पी. ए. तवर (पाटील) वकील यांच्यासमोर पेच निर्माण झाला. नावाजलेल्या बॅरिस्टरांना या केससाठी बोलवावे लागेल असे वकिलांनी सुचविले. हुलेसिंग मोतीराम जहागिरदार यांनीही वाटेल ती रक्कम मी मोजण्यास तयार आहे असे सांगितले. तवर वकिलांनी सुचविले की, महाडच्या चवदार तळ्याच्या पाण्याच्या सत्याग्रहाप्रसंगी मोठी हाणामारी झाली होती. ज्यांनी महाडचा सत्याग्रह घडविला ते विद्याविभुषित बॅरिस्टर डॉ. बी. आर. आंबेडकरांनाच आपण या केससाठी बोलावु या. कारण मुंबई कायदा मंडळाचे सदस्य मा. रावबहादुर सी. के. बोले यांनी दि. ४ ऑगस्ट १९२३ ला अस्पृश्यांसाठी सार्वजनिक ठिकाणे मुक्त असावीत ह्या अर्थाचा ठराव विधीमंडळात पास करून घेतला होता. त्या ठरावाची सर्वप्रथम अंमलबजावणी महाड नगरपरिषदेने केली. मात्र त्या चवदार तळ्यावरून अस्पृश्य समाजाला पाणी भरू दिले जात नव्हते. इ. स. १९२४ मध्ये महाड नगरपरिषदेने अस्पृश्यांसाठी खुला केला आहे असा ठराव केला होता. मात्र अंमलबजावणी करत नव्हते. तळ्यातील पाणी पिऊन आपला हक्क बजावणाऱ्या अस्पृश्य समाजाला ५००-६०० लोकांच्या जमावाने लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली होती. मात्र पोलीसांनी फक्त ८-९ जणांनाच आरोपी केले होते. हा खटला ६ जुन ते २१ जुन या कालावधीत अलिबाग येथे डिस्ट्रीक मॅजिस्ट्रेट मि. हुड यांच्यासमोर चालला व १५ दिवसात केसचा निकाल देण्यात आला. खटल्याच्या या निकालामुळे अस्पृश्यांचा फार मोठा विजय झाला. ब्रिटीश न्यायालयाने अस्पृश्यांच्या न्याय हक्काच्या बाजुने निकाल दिला. कमी वेळात चांगल्या पद्धतीने
कामकाज चालवुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांना पाण्याचा हक्क मिळवून दिला. ही वार्ता सर्वदूर पसरली होती. ती चर्चा धुळे येथील वकिलांपर्यंत येवून पोहोचली होती. म्हणुन हुलेसिंग मोतीराम जहागिरदार यांनी विचार केला की, बॅरिस्टर आंबेडकरच ही केस जिंकुन देऊ शकतात; पण प्रश्न निर्माण झाला की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी संपर्क साधावा कसा? आंबेडकरांशी संपर्क करण्यासाठी आपल्याला कोण मदत करेल ? त्याचवेळेस त्यांच्या लक्षात आले की, बडोद्याचे श्रीमंत सयाजीराव गायकवाड आपली मदत करू शकतात. कारण जहागिरदार यांचे सयाजीराव गायकवाड हे नात्याने सासरे लागत होते; कारण श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्या दरबारातील सरदारांच्या मुलीशी हुलेसिंग मोतीराम जहागिरदार यांचा विवाह बडोद्यातच झाला होता. तसेच हुलेसिंग मोतीराम जहागिरदार (पाटील, पवार) यांचे लहान बंधु यशवंतराव हे श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांचेकडेस शिक्षणासाठी बडोद्याला होते. त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर हे बडोद्याला काही दिवस नोकरीला होते. म्हणून हुलेसिंग मोतीराम जहागिरदार व यशवंत मोतीराम जहागिरदार यांनी बडोद्याला जावून श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांना विनंती केली की, आपण बॅरिस्टर डॉ. आंबेडकरांना आमच्या केस संदर्भात कामकाज करण्यासाठी सांगावे, अशी विनंती केली. मग श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी माणुस पाठवून बॅरिस्टर आंबेडकरांना निरोप पाठवला आणि मग डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सदर वाघाडीच्या केसचे कामकाज पहाण्यास होकार दिला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वाघाडी ता. शिरपूर, जि. पश्चिम खान्देश (धुळे) येथील केस १९२६-२७ च्या दरम्यान मिळाली असावी. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांना दि. ८/१०/१९२९ रोजी जे पत्र पाठविले आहे, त्या पत्रात बाबासाहेब आंबेडकर, दादासाहेबांना विचारतात की, मी धुळे येथील कोर्टाच्या अपिलाच्या तारखेची वाट पहात आहे. हे बाबासाहेब १९२९ मध्ये केसची तारखेची विचारणा करतात म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी ही केस
१९२९ च्या पूर्वी मिळाली असावी.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धुळे येथील केसबाबत कोणते वकील काम पहात आहेत त्या तवर वकिलांशी पत्रव्यवहार करून व समक्ष मुंबई येथे बोलावुन संपुर्ण केस समजून घेतली. श्रीमंत सयाजीराव गायकवाड महाराज यांच्याकडून आलेल्या केसची कुठल्याही प्रकारची फी न घेता केस लढवली आणि आपले पक्षकार हुलेसिंग मोतीराम जहागिरदार यांच्या बाजूने निकाल लावला. जहागिरदारांना वहीवाटीप्रमाणे त्यांना हक्क प्राप्त करून दिले.
या केसमध्ये अर्जदार हुलेसिंग मोतीराम पाटील (जहागिरदार ,पवार) यांच्याकडून ९ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात ५ साक्षीदार हे वाघाडी गावाचे रहिवासी होते आणि तेही सर्व समाजातील लोक होते आणि उर्वरित ४ साक्षीदार हे शेजारील गावाचे रहिवासी होते. लक्षणीय बाब म्हणजे ते प्रतिष्ठीत व्यक्ति होते. ते समाजातील विविध स्तरातून आलेले लोक होते आणि त्यांना वाघाडी गावाच्या भौगोलिक, राजकीय, सामाजिक, धार्मिक परंपरांचे ज्ञान होते. विशेष करून अहिल्यापूर येथील रहिवासी पौलादसिंग अंबरसिंग हे तालुका लोकल बोर्ड आणि जिल्हा लोक बोर्डचे सदस्य होते आणि संपूर्ण पश्चिम खान्देशात सुपरिचित सभ्य सद्गुहस्थ होते. म्हणून त्यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली होती. विरोधी पक्षकारांना पुरावे सादर करण्यास पुरेसा वेळ देवून सुद्धा विरोधी आपला हक्क सिद्ध करण्यास कमी पडले.
सर्वसामान्य माणसाला माहिती आहे की, ग्रामीण भागात पोळ्याच्या मिरवणुकीत नेतृत्व करण्याचा मान साधारणतः एखाद्या प्रमुख व्यक्तीस दिला जातो. या गोष्टी कोणीही नाकारु शकत नाही आणि हुलेसिंग मोतीराम जहागिरदार हे सदर गावामध्ये आर्थिक आणि सामाजिक या दोन्ही गोष्टीत सर्वात अग्रेसर आहेत अशी बाजू डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी व्यवस्थित मा. जिल्हा न्यायदंडाधिकारी यांच्या लक्षात आणून दिल्यावर कोर्टाने हुलेसिंग मोतीराम जहागिरदार याच्या बाजूने खालीलप्रमाणे निकाल दिला.
हुलेसिंग मोतीराम जहागिरदार यांनी पोळ्याच्या दिवशी वाघाडी येथे नेहमीच्या वहीवाटीप्रमाणे निघणाऱ्या बैलाच्या मिरवणुकीतून आपले बैल पुढे नेण्याचा हक्क शाबित केला आहे. त्याअर्थी वाघाडी येथील तमाम लोकांना कळविण्यात येते की, वाघाडी येथे पोळ्याच्या दिवशी दरवर्षी प्रमाणे निघणाऱ्या बैलाचे मिरवणुकीत हुलेसिंग मोतीराम जहागिरदार यांना त्यांचे बैल पुढे नेवु द्यावेत. त्यास कोणीही हरकत घेवू नये. ज्या कोणास सदर मिरवणुकीत भाग घ्यावयाचा नसेल त्यांनी भाग घेऊ नये. मात्र त्याने जहागिरदार यांच्या मिरवणुकीस व हक्कास हरकत करू नये. पोळ्याच्या मिरवणुकीच्या वेळाखेरीज इतर वेळी इतर कोणासही आपले बैल स्वतंत्र रितीने नेण्यास हरकत नाही.
अशा पद्धतीचा निकाल तत्कालीन मा. जिल्हा न्यायदंडाधिकारी ए. एच. ड्रॅकप मा. जिल्हा न्यायदंडाधिकारी साो. पश्चिम खान्देश (धुळे) यांनी हुलेसिंग मोतीराम जहागिरदार यांच्याकडून दिला.
केसच्या निकालाची ऐतिहासिक कागदपत्रे
हेही वाचा
लेख क्रमांक एक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धुळे येथील ऐतिहासिक भेट : Article 1
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ऐतिहासिक धुळे भेट : एक वास्तव’
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर न्यायालयीन कामकाजानिमित्त 31 जुलै 1937 आणि 17, 18, 19 जून 1938 रोजी धुळ्यात आले होते. आंबेडकरी चळवळीतील युवा नेतृत्व आनंद सैंदाणे यांनी बाबासाहेबांच्या ऐतिहासिक धुळे भेटीचे दस्तावेज संकलित केले. बाबासाहेबांनी खान्देशात विविध ठिकाणी भेट देत समाजप्रबोधन करण्याचा संदेश आपल्या अनुयायांना दिल्याचे पुरावेही त्यांना मिळाले. बाबासाहेबांच्या या ऐतिहासिक कार्याच्या आठवणींना कायमस्वरूपी उजाळा मिळत राहिला तर आंबेडकरी चळवळ बळकट होण्यास मदतच होईल, हे ओळखून बाबासाहेबांनी ज्या ट्रॅव्हलर्स बंगल्यात मुक्काम केला होता, त्या बंगल्याला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याची मागणी आहे. या मागणीच्या पाठपुराव्यासाठी आनंद सैंदाणे यांनी या ऐतिहासिक बंगल्याला ‘संदेश भूमी’ असे नाव दिले. तसेच संदेश भूमी संरक्षण आणि संवर्धन समितीची स्थापनाही केली. संदेश भूमी येथे बाबासाहेबांचा अर्धाकृती पुतळा आणि ग्रंथालय उभारून याठिकाणी शिक्षण तसेच प्रबोधनाचे कार्य अविरतपणे सुरू आहे. महाराष्ट्रातील खान्देश आणि विशेष करून धुळे शहराशी बाबासाहेबांचा असलेला वारसा जगाला माहित व्हावा याकरिता आनंद सैंदाणे यांनी एक पुस्तकही लिहिले आहे. संदेश भूमी राष्ट्रीय स्मारकाच्या चळवळीत खारीचा वाटा म्हणून आम्ही,आनंद जयराम सैंदाणे लिखित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ऐतिहासिक धुळे भेट : एक वास्तव’ या पुस्तकाची लेखमाला प्रत्येक रविवारी प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. या लेखमालेचा पहिला भाग रविवार दि. 21 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध होत आहे. आपण या लेखमालेला भरभरून प्रतिसाद द्याल, ही अपेक्षा..!
– संपादक/संचालक
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संदेश भूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समिती धुळे
आनंद सैंदाणे (अध्यक्ष)
दीपक नगराळे (उपाध्यक्ष)
रवींद्र शिंदे (सचिव)
विजय भामरे (सहसचिव)
विजय सूर्यवंशी (कोषाध्यक्ष)
सदस्य : विजयराव मोरे, बाळासाहेब अहिरे, नाना साळवे, चंद्रगुप्त खैरनार, शरद वेंदे, चंद्रभान लोंढे, अमित सोनवणे, विद्रोही थोरात, आनंदा सोनवणे