विकसित भारत संकल्प यात्रेचा समारोप
धुळे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारतर्फे देशभरातील विविध वयोगटांसह विविध समाजघटकांतील लाभार्थ्यांच्या आर्थिक उन्नतीसह त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध ७२ योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा आपापल्या गावांतील पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देणे, ही शासनाचे कर्मचारी म्हणून तुमची व लोकप्रतिनिधी म्हणून आमची सामूहिक जबाबदारी आहे. यामुळे सर्वच पात्र लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केले.
केंद्र शासनातर्फे गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचा फागणे (ता. धुळे) येथे नुकताच समारोप झाला, त्यात विविध योजनांच्या लाभार्थ्यांचा आढावा घेताना खासदार डॉ. भामरे बोलत होते. भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. अरविंद जाधव, जिल्हा परिषदेचे सदस्य राम भदाणे, सुधीर जाधव, भाजपचे तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील, फागणेच्या सरपंच विद्याताई पाटील, माजी सरपंच गोकुळ सिंघवी, पंचायत समितीचे माजी उपसभापती विद्याधर पाटील, बालू पाटील, मधू पाटील, भाईदास पाटील, विक्रम पाटील, दिनेश माळी, नगराज पाटील, धुळे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. चौधरी, विस्तार अधिकारी भीमराव गरुड यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, भाजपचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
खासदार डॉ. भामरे म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात विविध ७२ योजना राबवून समाजातील विविध घटकांच्या आर्थिक उन्नतीचा प्रयत्न सुरू केला आहे. यातून त्यांनी २०४७ पर्यंत विकसित भारताचे जे स्वप्न पाहिले आहे त्याची पूर्ती करण्याची जबाबदारी आपणा सर्वांवर आहे. या योजनांचा तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचवून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणताना त्यांची आर्थिक उन्नती साधण्यात येत आहे. यामुळेच ही विकसित भारत संकल्प यात्रा काढण्यात आली. या यात्रेद्वारे विविध योजनांचा आढावा घेत वंचित लाभार्थ्यांना लाभ देण्याचे काम झाले. यामुळे योजनांशी संबंधित सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधी म्हणून आपण सर्वांनी गावागावांतील एकही लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे. विशेषतः आरोग्य विभागासह गावातील आशा सेविका, ग्रामसेवकांनी सतर्क राहून आयुष्यमान भारत योजनेसह सर्वच योजनांच्या पात्र व गरजू लाभार्थ्यांपर्यंत हा लाभ पोहोचविण्यासाठी सतर्क राहावे. कारण देशभरातील ५० कोटी लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ देण्याचा लक्ष्यांक असून, तो पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करावी, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करूया, असे आवाहनही खासदार डॉ. भामरे यांनी या वेळी केले.
कर्मचारी, पदाधिकाऱ्यांचा सत्कार : भारत विकसित संकल्प यात्रेचे योग्य नियोजन करून धुळे तालुक्यातील विविध गावांतील लाभार्थ्यांपर्यंत केंद्र शासनाच्या ७२ योजनांची माहिती पोहोचविण्यासह त्यांची जागेवरच अंमलबजावणी करण्यात योगदान देणाऱ्या शासकीय अधिकारी, कर्मचारी व भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा यावेळी खासदार डॉ. सुभाष भामरे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. अरविंद जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात पंचायत समितीचे विस्तार अधिकारी भीमराव गरुड, भाजपचे विकसित भारत संकल्प यात्रेचे सहसंयोजक हरीश शेलार आदींचा समावेश होता.