विद्रोही मराठी साहित्य संमेलनासाठी ‘एक मुठ धान्य अन् एक रुपया’, प्रचार फेरी
धुळे : ‘एक मुठ धान्य आणि एक रुपया विद्रोहसाठी’, असा नारा देत धुळे शहरात बुधवारी 18 व्या विद्रोही साहित्य संमेलनाची प्रचारफेरी काढण्यात आली. अमळनेर येथे तीन आणि चार फेब्रुवारी रोजी हे संमेलन होत आहे.
खानदेश साहित्य संघ, अहिराणी साहित्य परिषद आणि अंकुर साहित्य संघ यांच्या वतीने या आवाहन फेरीचे आयोजन करण्यात आले होते. बुधवार, ३१ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजेपासून आयोजित “एक मुठ धान्य आणि एक रुपया विद्रोहसाठी” प्रचार फेरी मध्ये धुळे शहरातील देवपूर भागात क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या पुतळ्यापासुन ते जी. टी. बापुजी कॉलनी स्टॉपपर्यंत, जुना आग्रा रोडवर ही प्रचार फेरी झाली. क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांना अभिवादन करून या मदत फेरीला सुरूवात झाली. विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे प्रवर्तक अविनाश पाटील, प्रा. सदाशिव सूर्यवंशी, प्रभाकर सूर्यवंशी यांच्यासह साहित्यिक सहभागी झाले होते.
विद्रोही मराठी साहित्य संमेलनाविषयी : मानवतावादी आणि मुक्तीवादी साहित्यावर आधारित अठरावे विद्रोही मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे तीन आणि चार फेब्रुवारी रोजी होत आहे. विद्रोही मराठी साहित्य संमेलनात संपूर्ण भारतातून नामवंत लेखक, कवी, विचारवंत, साहित्यिक यांच्यासह साहित्य चळवळीतील दहा हजारांवर कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी होतील. तसेच आपल्या स्थानिक परिसरातूनही मोठ्या संख्येने लोक उत्स्फूर्तपणे सहभागी होतील. सदर संमेलनात सुमारे पाच हजार लोकांची तीन वेळ जेवण, दोन वेळ नाश्ता-चहा व एक दिवस मुक्कामाची सोय केली जाणार आहे. येणाऱ्या पाहुण्यांचे आदरातिथ्य करणे, बंधुभाव जोपासत सद्भाव वृद्धिंगत करणे हे आपल्या खान्देशी संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. विद्रोही साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अमळनेर येथे येणारे पाहुणे सोबत अनेक आठवणी घेऊन जातील. या संमेलनासाठी सरकारकडून एक रुपयाही दिला जात नाही किंवा विद्रोही साहित्य संमेलन समिती शासन दरबारी निधी मागण्यासाठी जात नाही.
सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर जिवंत, वास्तव अशा मानवतावादी व मुक्तीवादी साहित्यावर आधारित अठरावे विद्रोही मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे जनतेने उभारलेल्या निधीतून व सहकार्याने जनतेसाठी होणारे संमेलन असल्याने लोकसहभागाचा भाग म्हणून समाजाभिमुख व संवेदनशील व्यक्तिमत्व या नात्याने आपणही विद्रोही साहित्य संमेलनाच्या यशासाठी पूर्ण क्षमतेने तन-मन-धनाने मदत व सर्वतोपरी सहकार्य करावे, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.