मंत्रालयात बैठक घेवून विनोद वाईन्सचा कायमस्वरूपी निकाल लावणार : आमदार फारुख शाह
धुळे : शहरातील मध्यवर्ती भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या मागे असलेले विनोद वाईन्स हे विदेशी मद्याचे दुकान स्थलांतरित करावे, या मागणीसाठी आझाद समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी क्युमाईन क्लबजवळ सुरू केलेल्या आमरण उपोषणाला आमदार डॉ. फारुख शाह यांनी शनिवारी पाठिंबा दिला.
आमदार फारुख शाह यांनी उपोषणकर्ते आनंद लोंढे, भैय्यासाहेब वाघ आणि कार्यकर्त्यांची भेट घेतली व येत्या आठवड्यात मंत्रालयात राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांच्या दालनात उच्चस्तरीय बैठक घेवून विनोद वाईन्सचा कायम स्वरुपी निकाल लावणार असल्याचे आश्वासन दिले.
आझाद समाज पार्टीच्या वतीने गेल्या दोन महिन्यांपासून विनोद वाईन्स हे विदेशी मद्याचे दुकान हटवावे यासाठी आंदोलन सुरू केले आहे. तसेच आनंद लोंढे यांच्या नेतृत्वाखाली १ फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येत आहे. आमदार फारुख शाह यांनी शनिवारी उपोषणस्थळी भेट देवून उपोषणकर्त्या कार्यकर्त्यांना पाठिंबा दिला. यावेळी आमदार शाह यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क करून येत्या आठवड्यात मंत्रालयात विनोद वाईन्सच्या प्रश्नावर मंत्री महोदयांच्या दालनात बैठक आयोजित करणे बाबत सांगितले. त्यानुसार पुढील मंगळवारी किंवा बुधवारी मंत्रालयात ना. शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेवून आंबेडकरी जनतेच्या भावनेशी खेळणाऱ्या विनोद वाईन्सचा कायमचा निकाल लावण्यात येईल, असे प्रतिपादन आ. फारुख शाह यांनी केले.
यावेळी राज चव्हाण, सतिष अमृतसागर, हारूण खाटीक, आसिफ शाह आदी उपस्थित होते.
हेही वाचा
बाबासाहेबांच्या स्मारकाजवळील दारू दुकान हटविण्यासाठी आमरण उपोषण
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळील दारू दुकान हटविण्यासाठी समाज एकवटला
बाबासाहेबांच्या स्मारकाजवळील दारू दुकानाचा बोर्ड फोडला!