तरुणीवर अत्याचाराच्या आरोपातून संशयिताची निर्दोष मुक्तता
धुळे : शिंदखेडा तालुक्यात साळवे गावात पीडित तरूणीवर अत्याचार केल्याच्या आरोपातून राधेश्याम चतुर कोळी-बोरसे यांची धुळे येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश यास्मीन देशमुख यांनी निर्दोष मुक्तता केली. न्यायालयाने ३० जानेवारी २०२४ रोजी हा निकाल दिला, अशी माहिती संशयिताचे वकील ॲड. आनंद जगदेव यांनी दिली.
पीडित तरुणीने शिदंखेडा पोलिस स्टेशन येथे १७ जून २०१४ रोजी फिर्याद दिली होती. त्यानुसार भा. दं. वि. कलम ३७६, ३६३, ३६६ (अ), ५०६ सह लहान मुलांचे लैगींक अत्याचारापासुन संरक्षण अधिनियम २०१२ (पोस्को) चे कलम ३, ४, ६, प्रमाणे गु. र. नं. ७०/२०१४ अन्वये गुन्हा दाखल झाला होता.
फिर्यादीनुसार, राधेश्याम कोळी यांने दि. २९ मे २०१४ रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पीडित तरुणीला पळवुन नेले. गुजरात राज्यातील नवसारीसह महाराष्ट्रातील सिन्नर येथे घेऊन गेला. आपण पती-पत्नी आहोत असे भासवुन तिच्यावर बळजबरीने वेळोवेळी अत्याचार केला. सदर बाब कोणाला सांगितली तर जिवानिशी मारुन टाकु अशी धमकी दिली. त्यानंतर १६ जून २०१४ रोजी साळवे गावी नातेवाईकांकडे सोडुन दिले, अशी फिर्याद १७ जून २०१४ रोजी शिदंखेडा पोलिस स्टेशनला दिली.
यावरुन तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक वंसत भिकाजी सोनवणे यांनी तपास करुन कोर्टात दोषारोप पत्र दाखल केले. सदरच्या केसचे कामकाज धुळे येथे जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायाधीश यास्मीन देशमुख यांच्या कोर्टात कामकाज चालले. फिर्यादी पक्षातर्फे साक्षीदार भगवानसिंग सत्तारसिंग गिरासे, डॉ. रमेश काशिनाथ गठरी, सरला छबीलाल पवार (पोलीस शिपाई), तपास अधिकारी वसंत भिकाजी सोनवणे, (पोलिस उपनिरीक्षक), मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सुपडु वाघ, पुष्पा सुपडु वाघ असे एकुण ७ साक्षीदार तपासले. त्यात साक्षीदाराच्या पुराव्यातील तफावती तसेच पिडीतेच्या वयाबाबत व घटनेबाबत संशयास्पद नोंदी हे युक्तीवाद करताना ॲड. आनंद एस. जगदेव यांनी सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या संदर्भ केसेस देवुन कोर्टासमोर युक्तीवाद केला. कोर्टाने युक्तीवाद ग्राह्य धरुन आरोपीला निर्दोष सोडले.
सदर कामी ॲड. आनंद एस. जगदेव यांना ॲड. किशोर बी. परदेशी, ॲड. वैभव व्ही. साळवे, ॲड. महेश पी. काबंळे, ॲड. रेखा सोनार यांनी सहकार्य केले.