राईनपाडा सामुहिक हत्याकांडातील सात आरोपींना जन्मठेप
धुळे : जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातील राईनपाडा गावात बेदम मारहाण करून पाच भिक्षुकांची हत्या झाल्याने महाराष्ट्राला धक्का बसला होता. याप्रकरणी धुळे जिल्हा व सत्र न्यायालयाने निकाल जाहीर केला आहे. सात जणांना जन्मठेपेची शिक्षा तर 21 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
मुलांचे अपहरण करून किडन्या विकणारी टोळी आली आहे, अशी अफवा पसरल्याने गावात आलेल्या भिक्षुंना बेदम मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. एक जुलै 2018 रोजी हे हत्याकांड घडलं होतं. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कामकाज पाहिले. तात्कालीन पोलीस उप अधीक्षक श्रीकांत घुमरे तपास अधिकारी होते.
माणुकीला काळीमा फासणारे सामुहिक हत्याकांड : लहान मुलांना पळवून त्यांच्या किडनी विकणाऱ्या टोळ्या फिरत असल्याच्या अफवा सहा वर्षांपूर्वी सोशल मीडियावर पसरली होती. या खोट्या बातम्यांमुळेच जनता भयभीत झाली होती. अशातच दादाराव शंकरराव भोसले (वय 47), भारत शंकर भोसले (वय 45), राजू रामा उर्फ श्रीमंत भोसले (वय 45), भारत शंकर माळवे (वय 45) सर्व राहणार खवे ता. मंगळवेढा जि. सोलापूर आणि अगणू श्रीमंत हिंगोले (वय 22) रा. मानेवाडी ता. मंगळवेढा हे नाथजोगी गोसावी समाजातील भिक्षुक आपला उदरनिर्वाह करण्यासाठी आणि भिक्षा मागण्यासाठी राईनपाडा गावात गेले. सोशल मिडियावरील खोट्या बातम्यांमुळे हे भिक्षुक म्हणजेच मुलं पळविणारी टोळी असल्याचा समज करत ग्रामस्थांपैकी काहींनी त्यांना ग्रामपंचायत कार्यालयात कोंडून लाठ्या-काठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण करुन ठार मारले. विशेष म्हणजे या घटनेचे मोबाईल चित्रीकरण देखील आरोपींपैकी काहींनी केले होते. राज्याला हादरवुन सोडणार्या या मॉब लिंचींगच्या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले होते.
सहा वर्षांनंतर निकाल : याप्रकरणी पिंपळनेर पोलिसात एएसआय रवींद्र काशिनाथ रणधिर यांच्या फिर्यादीवरुन 35 आरोपींविरुध्द गुन्हा दाखल झाला होता. 28 आरोपी पोलिसांनी पकडले होते. या 28 पैकी 7 जणांनी लाठ्या-काठ्या आणि लोखंडी गजने भिक्षुकांना मारहाण करुन ठार मारले होते. आरोपींपैकी एकाने मोबाईल चित्रीकरण केले होते. राईनपाडा हत्त्याकांडाच्या घटनेची दखल राज्य शासनाने घेत विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली होती. तब्बल सहा वर्षानंतर राईनपाडा केसचा निकाल जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधिश डॉ. एफ. ए. एम. ख्वाजा यांच्या कोर्टात लागला.
या आरोपींना झाली शिक्षा : संपूर्ण राज्य हादरवुन सोडणार्या साक्री तालुक्यातील राईनपाडा येथील पाच निरपराध नाथजोगी गोसावी समाजातील भिक्षुकांच्या हत्याकांड प्रकरणी सात आरोपींना धुळे जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवार दिनांक ५ फेब्रुवारी रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यात महादू ओंकार खैरनार, महादू ओंकार पवार, दशरथ पिंपळसे, हिरालाल गवळी, मोतीलाल साबळे, काळू गावीतसह सात आरोपींना भिक्षुकांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवत त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. विशेष म्हणजे या 7 आरोपींना वेगवेगळ्या कलमान्वये 1 ते 10 वर्षापर्यंतच्या कालावधीची वेगवेगळी शिक्षा देखील सुनावली आहे. या सर्व शिक्षा एकत्र भोगायच्या आहेत.
जामिनावरील आरोपीला पकड वाॅरंट : जन्मठेपेची शिक्षा सुनावल्या गेलेल्या सात पैकी एक गुन्हेगार तात्पुरत्या जामिनावर बाहेर होता. तो निकालाच्या दिवशी कोर्टात न आल्याने त्याच्या विरोधात न्यायालयाने पकड वॉरंट काढले आहे.
संशयिताची तुरुंगातच आत्महत्या : संशयावरून अटक केलेल्या राजाराम राऊत या आरोपीने धुळे तुरुंगात गळफास घेत आत्महत्या केली होती. तर इतर आरोपींमध्ये महारू ओंकार पवार, दशरथ काल्या पिंपळसे, हिरालाल आत्माराम गवळी, गुलाब रामा पाडवी, युवराज चौरे, मोतीलाल साबळे, काळू सोमा गावित या आरोपींचा समावेश आहे. त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली.
मृतांच्या नातेवाईकांना मदतीचे आदेश : निरपराध भिक्षुकांच्या हत्येप्रकरणी शासनााने याआधीच पीडीतांच्या जवळच्या नातलगांना पाच लाखांची मदत केली होती. निकाल देताना न्यायाधिशांनी पिडीतांच्या नातेवाईकांना मदतीबाबतचे देखील आदेश दिले आहेत.
हत्याकांड पूर्वनियोजित नसल्याने फाशीची शिक्षा नाही : ॲड. उज्ज्वल निकम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, हत्याकांडात प्रत्यक्ष सहभागी असल्याचा पुरावा सापडला नाही म्हणून 21 संशयित निर्दोष सुटले. ज्या सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली त्यांच्याविरुद्ध पुरावे होते. मारेकऱ्यांनी खून करताना मोबाईल चित्रीकरण केले होते. या क्लिपच्या आधारे पोलिसांनी सात आरोपींची ओळख पटवली होती. कोर्टानेही क्लिपमध्ये दिसणाऱ्या सात आरोपींना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा दिली. सामूहिक हत्याकांड पूर्वनियोजित तसेच कटाचा भाग नव्हता. केवळ समाज माध्यमांवर आलेल्या खोट्या बातमीमुळे हे हत्याकांड घडले. त्यामुळे आरोपींना फाशीची शिक्षा झाली नाही. सदरचे हत्याकांड पोलिसांसमोर झालेले नाही. याउलट राईनपाडा गावातील पाच साक्षीदार फितूर झाले होते. त्यामुळे पोलिसांच्या महत्त्वपूर्ण साक्षीमुळे आरोपींना शिक्षा झाली.
ॲड. उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया : निकालानंतर माध्यमांशी बोालताना अॅड. उज्ज्वल निकम म्हणाले की, भिक्षुकांना प्लॅन करुन मारले नसले तरी जमावाने हिंसक होवून ठार मारणे हे निंदनिय आहे. हा माझा युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरला आणि आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. राईनपाडा प्रकरणाचा तपास करणारे तपास अधिकारी डीवायएसपी घुमरे, एपीआय श्रीकांत पाटील, पीएसआय अमृतकर यांचे देखील सहकार्य लाभले. त्याबद्दल या खटल्यामध्ये मला अॅड. देवेंद्रसिंह तंवर, गणेश पाटील यांची मोलाची मदत लाभली.