शाळकरी मुला-मुलींना शिवीगाळ करीत मारहाण करणाऱ्या शिक्षकावर कारवाईची मागणी
धुळे : तालुक्यातील मोराणे प्र. ल. येथील अभिजीत ठाकरे विद्यालयात विद्यार्थी-विद्यार्थिनिंना शिवीगाळ करीत मारहाण करणाऱ्या शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या धुळे जिल्हा कार्याध्यक्षा बुद्धप्रिया धोंडीराम पगारे यांनी केली आहे.
याबाबत शाळेतील विद्यार्थ्यांनी आरपीआय महिला आघाडीकडे तक्रारी केल्यानंतर बुध्दप्रिया पगारे यांनी जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी आणि पोलिसांना 2 फेब्रुवारी रोजी निवेदन दिले. त्यानुसार शाळेत उदयभान रामराव पाटील या शिक्षकाने 31 जानेवारी रोजी दोन विद्यार्थ्यांना मारहाण करून जखमी केले होते. निवेदनात म्हटले आहे की, सदर शिक्षक मुलांसह मुलींना देखील अभद्र भाषेत बोलतात. वेळोवेळी मारहाण करतात. मुलांच्या आणि पालकांच्या तक्रारीनंतर देखील संचालक मंडळ शिक्षकावर कोणतीही कार्यवाही करीत नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
याबाबत प्रदीप पवार, प्रकाश मराठे, प्रफुल्ल पवार, संदीप मराठे, तुळशीराम कुंभार, साधना जाधव, अमर बोरकर, संगिता चव्हाण, राजेंद्र मराठे, विलास सोनवणे, मुकेश मराठे, धिरज पाटील आदींनी तक्रारी केल्या आहेत.