धुळे महापालिकेतील दोन अधिकाऱ्यांच्या पदव्या बनावट, मुंबई आझाद मैदानावर धरणे आंदोलन
धुळे : महापालिकेतील सेवानिवृत्त उपायुक्त विजय सनेर आणि विद्यमान अभियंता कैलास शिंदे या दोघांची शैक्षणिक कागदपत्रे बनावट असल्याचा आरोप करीत धुळे शहरातील पत्रकारांनी मुंबई येथे आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तत्कालीन धुळे नगरपालिकेत 12 ऑगस्ट 1986 रोजी लिपिक पदावर रुजू झालेले विजय रघुनाथ सेनेर यांची शैक्षणिक आर्हता फक्त एसएससी होती. त्यानंतर धुळे महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर उपायुक्त म्हणून पदोन्नती मिळण्यासाठी त्यांनी बोगस, बनावट शैक्षणिक आर्हता प्रमाणपत्रांचा वापर केला. याबाबत गेल्या सहा महिन्यांपासून युवा दक्ष पत्रकार संघाने वेळोवेळी तक्रारी दिल्या. परंतु आजपर्यंत तत्कालीन सेवानिवृत्त उपायुक्त विजय रघुनाथ सनेर यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.तसेच महानगरपालिकेचे विद्यमान अभियंता कैलास नरहर शिंदे यांच्या बाबतीतही तसाच प्रकार आह. पदवी उत्तीर्ण नसताना बनावट प्रमाणपत्र सादर करून ते सेवा बजावत आहेत.धुळे महापालिकेतील या दोन्ही अधिकाऱ्यांवर शासनाची फसवणूक केल्याबद्दल फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी युवा दक्ष पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी 5 फेब्रुवारीपासून मुंबई आझाद मैदानावर बेंमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
या आंदोलनात युवा दक्ष पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौतम, पगारे, दिलीप शिंदे, प्रमोद झाल्टे प्रदीप शिंदे आदी सहभागी झाले आहेत.