हिरे मेडिकल कॉलेजला आमदारांची अचानक भेट
धुळे : भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयात संदर्भात सातत्याने तक्रारी येत होत्या म्हणून आ.फारुख शाह यांनी दिनांक सहा रोजी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास पूर्वसूचना न देता अचानक भेट दिली.
यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक गणी डॉलर, रफिक पठाण, आसिफ शाह, अकिब अली, जुबेर शेख, फैसल अन्सारी, सउद आलम, सलमान खान, समीर शाह, शाहरुख शाह आदी उपस्थित होते.
भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय हे धुळे शहर आणि जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले आहे. मात्र काही कामचुकार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमुळे रुग्ण आणि नातेवाइकांना अनेक गैरसोयीचा सामना करावा लागतो. यासंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यामुळे आ. फारुख शाह यांनी कुठलीही पूर्वसूचना न देता भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयास अचानक भेट दिली.
त्यावेळी रुग्णालयातील अस्वच्छता आणि कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा अधिष्ठाता डॉ. भामरे यांच्या निदर्शनास आणून दिला. सुरुवातीस अधिष्ठाता कार्यालयात बैठक घेण्यात येवून सर्व विभागप्रमुख आणि कर्मचारी यांचेशी चर्चा करून सफाई कामगाराची अपेक्षित संख्या नसणे, तांत्रिक कर्मचाऱ्यांचा तुटवडा, डॉक्टरांचा तुटवडा यासारख्या समस्या जाणून घेतल्या. याबाबतीत वैद्यकीय शिक्षण मंत्री यांचेकडे बैठक लावून समस्यांचे निराकरण करणे बाबत आश्वासित केले. त्यानंतर अधिष्ठाता डॉ. भामरे, अधिक्षक डॉ. पाठक, डॉ. अरुण मोरे, डॉ. मुकरम खान, डॉ. परवेज मुजावर, प्रशासन अधिकारी कुमावत यांना सोबत घेवून बाह्य रुग्ण विभागाची पाहणी केली व संबंधितांना सक्त सूचना केल्यात.