ईव्हीएमविरोधी प्रचार-प्रसारासाठी राज्यभर रॅली
धुळे : निवडणुकांमधील ईव्हीएमचा वापर लोकशाहीला मारक आहे. देशात लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठी मतदारांनी आवाज उठविणे गरजेचे आहे. ईव्हीएमवर आमचा विश्वास नाही. त्यामुळे आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात, अशी भूमिका संविधान विश्लेषक अनंत भवरे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील, कामगार नेते काॅ. एस. यु. तायडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत मांडली.
लाॅर्ड बुद्धा चॅरिटेबल ट्रस्ट जालना आयोजित देश, लोकशाही, संविधान बचाव राष्ट्रीय अभियान अंतर्गत ‘ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट हटाव, बॅलेट पेपर लाव’ राज्यव्यापी रॅलीचे मंगळवारी धुळे शहरात आगमन झाले. धुळ्यातील संविधान बांधिलकी महोत्सव नागरी संयोजन समिती आणि ईव्हीएमविरोधी कृती समिती, धुळे नागरिकांच्या वतीने रॅलीचे स्वागत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ करण्यात आले. बाबासाहेबांना अभिवादन करून शहरातील विविध भागात ईव्हीएमविरोधी प्रचार-प्रसार करण्यात आला. यावेळी काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, अंनिसचे राज्य अध्यक्ष अविनाश पाटील, ॲड. विशाल साळवे, काॅम्रेड एल. आर. राव, शंकर खरात, किरण गायकवाड, राहुल वाघ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित प्रबोधनात “ईव्हीएम हटाव, देश बचाव” असा नारा देवून संवाद, चर्चा करण्यात येत आहे. या महाअभियानाची माहिती देण्यासाठी मंगळवारी सायंकाळी 4 वाजता साक्री रोडवरील पत्रकार भवनात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
या राष्ट्रीय अभियानात सहभागी होण्याचे आवाहन अनंत भवरे (छत्रपती संभाजीनगर), अंनिसचे राज्य अध्यक्ष अविनाश पाटील, एस. यू. तायडे, कॉ. एल. आर. राव, हरीशचंद्र लोंढे आणि सहकारी, ई व्ही एम विरोधी कृती समिती, धुळे आणि धुळे महानगर संविधान बांधिलकी महोत्सव नागरी संयोजन समिती यांनी केले आहे.
राज्यव्यापी अभियानाची भूमिका अशी : जेव्हापासून आपल्या देशात ईव्हीएमद्वारे निवडणुका घेण्यास सुरुवात झाली तेव्हापासून विशिष्ट राजकीय पक्षांना सत्तेवर बसविले जात आहे. हा सत्ताधारी व मुख्य निवडणूक आयोगाचा प्रताप म्हणजे भारतीय जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणण्याचा डाव गेल्या अनेक वर्षांपासून या देशात चालू आहे. 2014 पासून याचा अतिरेक म्हणून अतिउच्च टोक गाठले आहे. त्यामुळे स्वतःचे स्वातंत्र्य आणि अस्तित्व गमावून सत्ताधाऱ्यांची कटपुतली मुख्य निवडणूक आयोग झालेला आहे. राष्ट्रपती आणि सर्वोच्च न्यायालय आज 2024 च्या काळात बघ्याची भूमिका घेताना दिसत आहेत. निवडणूक आयोगाकडे एकूण 23 हजार तक्रारी मध्यप्रदेश, राजस्थान, मिझोराम आणि तेलंगणा या पाच राज्यातील निवडणुका झाल्यानंतर आलेल्या असताना त्याला आयोगाने केराची टोपली दाखवली. म्हणून तक्रारकरांनी वकिलामार्फत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून पोहोचलेले आहेत. आता सर्वोच्च न्यायालयाच्या हातातच सर्व लोकशाहीचे आयुष्य अवलंबून आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईल तेव्हा येईल, जो येईल तो येईल, परंतु भारतीय जनतेला मात्र त्यांच्याप्रमाणे बघायची भूमिका घेऊन चालणार नाही. कारण लोकशाहीच्या नावावर येथील व्यवस्थेने जगता जगता मरण्याची आणि मरता मरता जगण्याची दयनीय अवस्था आमच्यावर लादलेली आहे आणि आमचा विश्वास असा झालेला आहे की, सर्व क्षेत्रातील समस्यांचे मूळ हे या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्यावर निवडणुका घेण्यात आहे. म्हणून प्रथम प्रयत्न हा जनजागृतीच्या माध्यमातून या अभियानाद्वारे आम्ही कर्तव्यनिष्ठ, संविधाननिष्ठ भारतीय सर्वसामान्य नागरिक या नात्याने ही जागृती करीत आहोत.
गेल्या 75 वर्षांच्या इतिहासात कोणत्याही पुरोगामी चळवळीची सुरुवात महाराष्ट्रात झालेली आहे. नेहमी महाराष्ट्राने देशाला या संदर्भात दिशा दिलेली आहे. म्हणून या अभियानाची सुरुवात सुद्धा आम्ही महाराष्ट्रातूनच करणार आहोत. त्यानंतर देशातील इतर राज्यातील संविधाननिष्ट नागरिकांच्या सहकार्याने देशभर जागृती करणार आहोत. देशातील लोकशाही व संविधान ही विज्ञानवाद आणि विवेकवाद म्हणजेच मानवतावादावर आधारित आहे. परंतु साम-दाम-दंड आणि भेदाच्या कूटनीतीने अतिक्रमण करून संपूर्ण लोकशाहीचे धिंडवडे गेल्या 75 वर्षात काढल्यामुळे आभाळच फाटले. ठिगड कुठे कुठे लावायचे हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
अशाही नकारात्मक परिस्थितीत एक आशेचा किरण अजूनही सकारात्मकतेच्या माध्यमातून जिवंत आहे. तो पॉझिटिव्ह कॉन्फिडन्स म्हणजेच गुलामांना गुलामीची जाणीव करून देण्याचा डोळस आत्मविश्वास याच शक्यतेच्या बळावर या महाराष्ट्रात या अभियानाची आम्ही सुरुवात करत आहोत. तेव्हा महाराष्ट्रातील सर्व संविधान निष्ठावंतांनी या मोहिमेस तन, मन आणि धनाने आपल्या जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी आल्यानंतर केलेल्या प्रत्येक आवाहनाला प्रतिसाद म्हणून आम्ही आपल्याला साथ घालण्याचे नैतिक कर्तव्य तुम्हाला पार पाडावे लागणार आहे.
या अभियानाची सुरुवात आम्ही 25 फेब्रुवारीपासून केली आहे. 20 मार्चपर्यंत अभियान चालणार आहे. तेव्हा जास्तीत जास्त जनतेने यात सहभागी होऊन ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटला हटविण्यासाठी जागृती करण्यासाठी आम्हाला मदत करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.