रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांना ‘आनंदाचा शिधा’ मिळण्याची शक्यता
धुळे : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ईर्शादभाई जहागिरदार यांच्या प्रयत्नांमुळे पवित्र रमजान महिन्यात राज्यातील मुस्लिम बांधवांना आनंदाचा शिधा मिळण्याची शक्यता आहे. ईर्शादभाई जहागिरदार यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राज्यभर सर्व जिल्ह्यांमध्ये प्रशासनाला निवेदन देत तशी मागणी केली. मंत्रालय पातळीवर ईर्शादभाई स्वतः पाठपुरावा करीत आहेत. पक्षाचे नेते अजित पवार उपमुख्यमंत्री असल्याने मुस्लिम बांधवांना आनंदाचा शिधा मिळणारच असा दावा पक्षाने केला आहे.
मार्च महिन्यात मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान सण असून, त्या महिन्यात आनंदाचा शिधा मिळावा, अशी मागणी असलेले निवेदन राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातर्फे गेल्या आठवड्यात धुळे जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, रमजान हा राष्ट्रीय सणांपैकी एक सण असून, एकता आणि बंधुभावाचा संदेश देणारा उत्सव आहे. ज्या प्रकारे दिवाळी हा सण सर्व देशवासी मिळून साजरा करतात, त्या प्रकारे रमजान ईद देखील सर्व देशवासी साजरी करतात. त्यामुळे रमजान महिन्यात आनंद शिधा मिळाला तर प्रतेक गोर-गरीब प्राधान्य कुटूंब लाभार्थी यांना त्याचा लाभ होईल. अशा प्रकारची मागणी निवेदनाद्वारे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातर्फे जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे नोंदविण्यात आली.
निवेदन देताना धुळे शहर जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी, धुळे शहर कार्याध्यक्ष जावेद बिल्डर, धुळे शहर कार्याध्यक्ष रवींद्र आघाव, धुळे शहर युवा जिल्हाध्यक्ष कुणाल पवार, महिला धुळे शहर जिल्हाध्यक्षा जयाताई साळुंखे, राजेंद्र चितोडकर, रईस काझी, सुरेश अहिरे, संजय अहिरे, उमेश महाले, ज्ञानेश्वर माळी, माजिद अन्सारी, चेतन पाटील, नजीर शेख, एजाज शेख, जयेश पाटील, गणेश धुळेकर, फिरोज पठाण, वंदना केदार, फरजान शहा व पक्षातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.