पुरस्कार पुरस्कृतांच्या सन्मान, कथाकथन, परिसंवाद, एकपात्री प्रयोगसह होणार काव्यसंमेलन
धुळे : येथील अहिराणी साहित्य परिषद व विद्यावर्धिनी सभा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. 3 मार्च रोजी राज्यस्तरीय चौथे अहिराणी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले. विद्यावर्धिनी महाविद्यालयात स्व. अण्णासाहेब सदाशिवराव माळी साहित्य नगरीत सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत होणार्या संमेलनात पुरस्कार परस्कृतांच्या सन्मान, विविध विषयांवर चर्चा, कथाकथन, परिसंवाद, एकपात्री प्रयोगासह काव्य संमेलन होईल. त्यात विशाल खान्देशातील अहिराणी मायबोलीचा हा जागर होत असून त्यात सहभागी होण्याचे आवाहन परिषदेचे अध्यक्ष प्रा.भगवान पाटील यांनी आज पत्र परिषदेत केले.
शहरातील साक्री रोडवरील जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या हॉलमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी सचिव प्रभाकर शेळके, सुमनताई महाले आदी उपस्थित होते.
पुढे बोलतांना प्रा. भगवान पाटील यांनी सांगितले की, संमेलनाचे स्वागताध्यक्ष माजी आ. प्रा. शरद पाटील तर अध्यक्षस्थान अक्षय छाजेड हे भुषविणार आहेत. या संमेलनात पुरस्कार पुरस्कृतांचा सन्मान करण्यात येणार असून त्यात डॉ. अरूण साळुंखे, विजय पाटील, श्रीमती कलाावती माळी, प्रा. भालचंद्र साळुंखे, श्रीमती सुमन देसले यांचा समावेश आहे. तर प्रा. सदाशिव माळी यांना मरणोत्तर जीवनगौरव सन्मान दिला जाणार आहे. याबरोबरच उमविचे प्रथम कुलगुरू प्रा. डॉ. एन. के. ठाकरे, श्रीमती शंकुंतला बोरसे कुंभार यांनाही जीवन गौरव पुरस्कार दिला जाणार आहे. तर श्रीमती आशाताई रंधे, डी. डी. पाटील, प्रा. व्ही. के.भदाणे, प्रा. सुनिल गायकवाड, प्रा. बी. एन. पाटील, अविनाश पाटील, विश्वास बिरारी, नवोदित साहित्यीक प्रविण पवार यांचा सन्मान करण्यात येणार आहे. संमेलनात विविध विषयांवर चर्चा केली जाईल. तसेच कथाकथन, परिसंवाद, एकपात्री प्रयोग, काव्य संमेलन आयोजित करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
संमेलनासाठी अहिराणी साहित्य परिषद व विद्यावर्धिनी सभेच्या कार्यकारिणीचे सहकार्य लाभले म्हणून हे चौथे अहिराणी साहित्य संमेलन स्व. सदाशिव माळी साहित्य नगरीत कै. प. पू. ब. ना. कुंभार गुरूजी विचारमंचावर आयोजित करण्यात आले असून त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन स्वागताध्यक्ष माजी आ. शरद पाटील, अध्यक्ष अक्षय छाजेड, युवराज करनकाळ यांच्यावरतील करीत असल्याचेही प्रा. भगवान पाटील, सचिव शेळके यांनी सांगितले.