धुळे (Dhule): बोरकुंड (#borkund) (ता. धुळे) येथे बुधवारी सायंकाळी चंद्रज्योतीच्या बिया (chandrajyotichya biya) खाल्ल्याने सात मुलांना विषबाधा झाली आहे.
अश्विनी जयसिंग भील (12), सुमित भावलाल भोई (12), गणेश धोंडू भील (10), कृष्णा भावलाल भोई (7), दीदी जयसिंग भील (14), मनिषा रामदास भोई (18) अशी विषबाधा झालेल्या मुलांची नावे आहेत. या मुलांनी सायंकाळी काजु समजून चंद्रज्योतीच्या (jatropha-seeds) विषारी बिया खाल्ल्या. त्यातुन विषबाधा झाल्याने उलट्या, मळमळ असा त्रास जाणवला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर या मुलांच्या कुटूंबियांनी गावातील दीपक मराठे आणि भागवत अहिरे यांच्या मदतीने त्यांना धुळे येथे हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. यासाठी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांचे सामाजिक कार्यकर्ते गोकुळसिंग राजपूत यांनी सहकार्य केले. रुग्णालयातील डॉक्टरांनी मुलांवर योग्य उपचार केले असून, त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे सांगण्यात आले.
दहा वर्षांपूर्वी वेल्हाणे ता. धुळे येथे चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने अनेक मुलांना विषबाधा झाली होती. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नागपूर, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये अशा घटना सतत घडत असतात. त्यामुळे मुले आणि पालकांमध्ये जनजागृती केली जाते. धुळे जिल्ह्यात असा प्रकार गेली काही वर्षे घडला नाही. परंतु बोरकुंडच्या घटनेमुळे शाळकरी मुलांमध्ये या बियांच्या बाबतीत जनजागृतीची गरज असल्याच्या प्रतिक्रिया आहेत.
काय आहेत चंद्रज्योतीच्या बिया?
बायोडिझेल तयार करण्यासाठी या बियांचा उपयोग होतो, इतक्या विषारी बिया आहेत. चंद्रज्योतीचे झाड हे एरंडीच्या झाडासारखेच दिसते. त्याला हिरव्या रंगाची फळे येतात. हे फळ फोडल्यावर त्यातुन बिया निघतात, ज्या काजुसारख्या दिसतात आणि लहान मुले या बिया काजु समजून खाउन टाकतात. विशेष म्हणजे या बिया अतीशय चविष्ट लागतात असे सांगण्यात आले. परंतु त्या खाल्ल्यानंतर काही वेळातच विषबाधा होते. वेळीच उपचार झाले नाहीत तर जीव देखील जाउ शकतो.













