मिल परिसरात तरुणाचा गळा चिरुन खून
धुळे : पूर्व वैमनस्यातून मिल परिसरातील सहजीवन नगरात राहणार्या तरुणाची रात्री ५ जणांनी गळा चिरुन हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका संशयीताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिल परिसरातील सहजीवन नगर महादेव मंदिरासमोर चक्करबर्डी रोड, धुळे येथे राहणार्या ऋषीकेश छगन गुलदगडे (वय २५) या तरुणाने शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार मध्यरात्रीनंतर १२.१५ वाजेच्या सुमारास सहजीवन नगर येथील नवनाथ महाराज मंदिरासमोरील बाकड्यानजीक लक्ष्मीवाडी येथे राहणार्या आदित्य राजु मेंढे, त्याचाभाऊ हर्षल मेंढे, राजू मेंढे, जयेश उर्फ गोलू सुरेश धापटे, गुणवंत सोनवणे यांनी ऋषीकेश यांचा भाऊ अमोल गुलदगडे याच्यावर हल्ला केला. धारधार शस्त्राने अमोल गळा चिरला. त्यानंतर लाकडे दांडके आणि दगडांनी मारहाणही केली. यात अमोलचा मृत्यू झाला. पोलिसांनी हर्षल राजू मेंढे याला ताब्यात घेतले आहे.
२०१८ मध्ये डिसेंबर महिन्यात मोहाडी पोलिस ठाण्यात भादंवि ३९५ प्रमाणे हर्षल याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी ऋषीकेश यांनाही गुन्ह्यात त्याने अडकविले होते. त्यावरुन ऋषीकेशचा भाऊ अमोल याने मारहाण केली होेती. त्या वादातूनच अमोलचा खून झाल्याची एफआयआरमध्ये नोंद करण्यात आली आहे.
अमोलचा गळा चिरुन मारहाण होत असताना घटनेची माहिती कळताच ऋषीकेश हा मित्रांसोबत घटनास्थळी पोहचला. ऋषीकेश आणि त्याच्या भावाने अमोलला हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे डॉ. चंद्रप्रकाश यांनी तपासून अमोलला मयत घोषीत केले.
अमोल गुलदगडे याच्या खूनाच्या घटनेची माहिती कळताच पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधिक्षक किशोर काळे, सहायक पोलिस अधिक्षक ऋषीकेश रेड्डी, एलसीबी पीआय दत्तात्रय शिंदे, धुळे शहर पोलिस ठाण्याचे धिरज महाजन, एपीआय दंडीले, पीएसआय बैसाणे यांनी घटनास्थळी भेट दिली.