उमेदी महिलांच्या सरस महोत्सवाला नंदुरबारकरांचा भरभरून प्रतिसाद
नंदुरबार : उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत महिला बचत गटांनी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय सरस महोत्सवाला नंदुरबारकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. आदिवासी गावपाड्यातील महिलांच्या स्टॉल्सवर लाखोंची उलाढाल झाल्याचं पाहायला मिळालं. या उमेदी महिलांची उद्योजकतेकडं होणारी प्रगतीची वाटचाल पाहून लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांनीही समाधान व्यक्त केलं.
ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या साक्षर आणि सक्षम करण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र शासनानं उमेद अभियानाची सुरुवात केली. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान कार्यक्रमांतर्गत नंदुरबार जिल्ह्याच्या गावपाड्यापर्यंत बचत गटांचं जाळं विणलं गेलं. या अभियानात काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून तर गाव पातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळं या महिला आर्थिकदृष्ट्या साक्षर झाल्या. एवढंच नव्हे तर कुरडया आणि पापड यांसारख्या व्यवसायाची पारंपरिकता झुगारून उद्योजकेकडे भरारी घेत त्या सक्षमही झाल्या.
गावपाड्यातील आदिवासी महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना मार्केट उपलब्ध करून देण्यासाठी शासनानं महालक्ष्मी सरससारखी प्रदर्शनं राज्यभर सुरू केली. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून नंदुरबार येथे छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात जिल्हास्तरीय सरस महोत्सव भरविण्यात आला. संसदरत्न खासदार डॉ. हिनाताई गावित यांच्या हस्ते शुभारंभ झालेल्या या महोत्सवाला नंदुरबारकरांनी गेली पाच दिवस भरभरून प्रतिसाद दिला. या महोत्सवात लाखोंची उलाढाल झाली आणि बचत गटांना उत्पन्न मिळालं. एक तारखेपासून पाच दिवस चाललेल्या या महोत्सवाचा मंगळवारी यशस्वीरीत्या समारोप करण्यात आला.
सरस महोत्सवाच्या शुभारंभ समारंभाला खासदार डॉ. हिनाताई गावित यांच्यासह जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रियाताई गावित, सभापती संगीता गावित, हेमलता शितोळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, जिल्हा परिषद सदस्या राजश्री गावित, प्रकल्प संचालक राहुल गावडे, जिल्हा अभियान व्यवस्थापक यशवंत ठाकूर उपस्थित होते.
सरस महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा अभियान व्यवस्थापक यशवंत ठाकूर, जिल्हा व्यवस्थापक उमेश अहिरराव, सचिन बोरसे, कार्यालयीन अधीक्षक चंद्रकांत चावरे, तालुका अभियान व्यवस्थापक अजय जाधव, संजीवन संन्यासी, मीनाक्षी वळवी, नाना पावरा, ईश्वर जगदाळे, निलेश वसावे, कुणाल कानडे, किशोर पवार, किशोर बिरारे, अरविंद बागले, दिलीप बैसाणे, पिंकी वळवी, अरविंद गावित यांच्यासह सर्व प्रभाग समन्वयक आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतलं.