शिक्षकानेच केले मुलींचे नको ते फोटो व्हायरल, दहिवेल महाविद्यालयातील संतापजनक प्रकार
धुळे : साक्री तालुक्याच्या दहिवेल येथील उत्तमराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालयातील एका शिक्षकाने महाविद्यालयाच्या व्हाट्सअप ग्रुपवर मुलींचे नको ते फोटो व्हायरल करून आदिवासी मुलींची बदनामी केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
या प्रकाराला महिना उलटला तरी कोणतीही कारवाई होत नसल्याने महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियानाच्या नेतृत्वाखाली आदिवासी संघटनांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सोमवारी धुळे येथे सायबर क्राईम पोलिसांची भेट घेऊन निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, दहिवेल येथील उत्तमराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालयात साक्री तालुक्यातील आदिवासी मुले-मुली शिक्षण घेत आहेत. त्यांची निवास व भोजन व्यवस्था शासकीय आदिवासी वस्तीगृहात करण्यात आली आहे.
काय आहे नेमके प्रकरण : 9 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमाराला ‘इयत्ता अकरावी सायन्स ग्रुप’, ‘साक्री तालुका आमदार ग्रुप’, ‘बल्हाने ग्रुप’ या वेगवेगळ्या ग्रुपवर मुलींचे अश्लील फोटो व्हायरल झाले. धक्कादायक म्हणजे फोटो व्हायरल करणारा दुसरा तिसरा कोणी नसून, चक्क उत्तमराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालयातील इंग्रजी विषयाचा शिक्षक अविनाश भटू पाटील होता. त्याने त्याच्या व्हाट्सॲप क्रमांकावरून अत्यंत बीभत्स, घाणेरडे फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल करून आदिवासी मुलींची प्रतिमा कलंकित केली. केवळ आदिवासी समाजातच नव्हे तर संपूर्ण मानव जातीला काळीमा फासण्याचे कृत्य केले आहे. या महाशयांचे हे कृत्य नेहमीचे आहे. यापूर्वीही असे प्रकार त्यांनी केले आहेत. विकृत मनोवृत्तीचे हे शिक्षक समाजासाठी कलंक आहेत.
वसतिगृहाच्या महिला वाॅर्डनची बघ्याची भूमिका : दहिवेल येथील शासकीय आदिवासी मुलींचे वस्तीगृहाच्या गृहपाल श्रीमती रीना जाधव यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. वसतिगृहाच्या गृहपाल म्हणून मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांची आहे. त्यामुळे हा प्रकार घडल्यानंतर त्यांनी लगेच गुन्हा दाखल करणे अपेक्षित होते. परंतु त्यांनी याबाबत 10 फेब्रुवारी रोजी केवळ महाविद्यालयाच्या प्राचार्यांना पत्र लिहून जबाबदारी झटकली. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनात केली आहे.
शिक्षक म्हणतो माझा मोबाईल हॅक झाला होता : हा प्रकार घडल्यानंतर संबंधित शिक्षक अविनाश भटू पाटील याने त्याचा मोबाईल हॅक झाल्याबाबत सायबर क्राईमकडे ऑनलाईन तक्रार केली आहे. त्या तक्रारीचाही अद्याप कोणताही तपास झालेला नाही. पोलिसांचे म्हणणे आहे की, आम्ही व्हाॅट्सॲप कंपनीकडून माहिती मागविली आहे. माहिती मिळाल्यानंतर सत्यता समोर येणार आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा सखोल आणि तांत्रिक तपास करुन संबंधित दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी निवेदनात केली आहे.
निवेदन देताना महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियानाचे धुळे जिल्हा प्रमुख गणेश गावित, सामाजिक कार्यकर्ते संदीप भोये, संतोष चौधरी, संदीप सूर्यवंशी, महिला अध्यक्षा पुष्पाताई चौधरी, आदिवासी एकता परिषदेचे माजी राष्ट्रीय युवा अध्यक्ष प्रेमचंद सोनवणे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.