खासदार राहुल गांधींसोबत धुळ्यात कोणकोणते नेते असतील?
धुळे : काॅंग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा 13 मार्च रोजी धुळे शहरात येत आहे. महिला न्याय हक्क परिषदेत खासदार राहुल गांधी महिलांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तथा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या प्रतिभा शिंदे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. शहरालगत मुंबई-आग्रा महामार्गावर गुरुद्वारानजीक एका मोकळ्या मैदानात दुपारी 11.30 वाजता ही परिषद होईल.
राहुल गांधी यांच्यासोबत अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, खासदार दिग्विजय सिंग, जयराम रमेश, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा अलका लांबा, एआयसीसी सह प्रभारी सोनलबेन पटेल, आमदार कुणाल पाटील, प्रतिभा शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
प्रतिभा शिंदे यांनी सांगितले की, देशभरात मागील दहा वर्षात महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बलात्कारी नराधमांची बाजू रस्त्यापासून संसदेपर्यंत सत्ताधारी घेत आहेत. जीवनावश्यक वस्तूंची महागाई केंद्र सरकारच्या आशीर्वादाने प्रचंड वाढलेली आहे. याचा सर्वाधिक फटका महिलांना बसत आहे. वाढती बेरोजगारी महिला आणि मुलींच्या रोजगाराचा प्रश्न अधोरेखित करत आहे. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील मुलींचे प्रश्न वाढले आहेत. दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक, ओबीसी, शेतकरी, शेतमजूर वर्गातील महिलांना केंद्र सरकारच्या जनताविरोधी धोरणांचा सर्वाधिक त्रास होत आहे. याला वाचा फोडण्यासाठी धुळे शहरात भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून महिला न्याय हक्क परिषदेत खासदार राहुल गांधी महिलांशी संवाद साधणार आहेत.
धुळे शहर आणि परिसरातील महिलांनी या परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आमदार कुणाल पाटील, काँग्रेस नेत्या प्रतिभा शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी कुणाल पाटील यांनी केले आहे.