धुळ्यात 70 प्रशिक्षणार्थी पोलिसांना अन्नातून विषबाधा
धुळे : येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचाऱ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना दुसऱ्यांदा घडली. गुरुवारी रात्रीच्या जेवणातून सुमारे 70 पोलीस कर्मचाऱ्यांना विषबाधा झाली. त्यांच्यावर भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. पोलीस प्रशिक्षण केंद्रात अन्नातून विषबाधा झाल्याचे वृत्त खरे आहे. सर्व प्रशिक्षणार्थींना वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असून, त्यांची प्रकृती सुधारत आहे, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी दिली.
धुळे येथे शिवतीर्थ चौकाकडून फाशीपूल चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर पूर्वी असलेल्या राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक सहाच्या मैदानावर पोलीस प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी असलेले हे राज्यातील पहिले प्रशिक्षण केंद्र आहे. परंतु आता पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांचेही ट्रेनिंग या केंद्रात दिले जाते.
उपहार गृहातच बिघडली प्रकृती : गुरुवारी नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. रात्री आठ वाजता जेवणाच्या हॉलमध्ये सर्व एकत्र जमले. जेवण करत असतानाच एका प्रशिक्षणार्थीची प्रकृती बिघडली. घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने रुग्णवाहिका बोलविण्यात आली. रुग्णवाहिका दाखल होत नाही तोपर्यंत एका पाठोपाठ एक याप्रमाणे 70 जणांना एकाच वेळेस अस्वस्थ वाटू लागले. या सर्वांना रुग्णवाहिका आणि पोलीस प्रशिक्षण केंद्रातील मोठ्या वाहनांनी तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.
सर्वांची प्रकृती स्थिर : पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थींना अन्नातून विषबाधा झाली असल्याची माहिती हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांना आधीच कळविण्यात आली होती. त्यामुळे प्रशिक्षणार्थी पोलिसांना रुग्णालयात दाखल करण्याच्या आधीच वैद्यकीय यंत्रणा अलर्ट होती. हिरे रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचाऱ्यांवर त्वरित उपचार सुरू केले. त्यामुळे सर्व बाधित रुग्णांची प्रकृती आता सुधारत आहे, अशी माहिती डॉ. रवी सोनवणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
विषबाधा होण्याची दुसरी घटना : धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात अन्नातून विषबाधा होण्याची पुनरावृत्ती झाली आहे. काही वर्षांपूर्वी देखील अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार घडला होता. त्यावेळी तरुणींचे प्रशिक्षण सुरू होते. त्यांनाही तातडीने उपचार मिळाल्याने मोठा अनर्थ टळला होता. अन्नातून विषबाधा झाल्याची घटना दुसऱ्यांदा घडल्याने चिंता व्यक्त होत आहे.