आमदार कुणाल पाटील काँग्रेसचे स्टार प्रचारक, महाराष्ट्रात लोकसभा प्रचाराची जबाबदारी
धुळे : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्यावर महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराची जबाबदारी सोपाविण्यात आली असून त्यांचा स्टार प्रचारक म्हणून देशातील मातब्बर नेत्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ते महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे स्टार प्रकारक असणार आहेत.
लोकसभा निवडणूकची रणधुमाळी आता सूरु झाली आहे. काँग्रेस पक्षाच्यावतीने विविध समितीच्या माध्यमातून पक्षाच्या प्रचाराची रणनीती निश्चित केली जात आहे. त्याअनुषंगाने महाराष्ट्र लोकसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्यावतीने स्टार प्रचारकांची नावे नुकतीच घोषीत करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, कॉग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी महाराष्ट्र लोकसभेच्या प्रचारासाठी स्टार प्रचारकांची नावे जाहिर केली. त्यात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, कॉग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, रमेश चेन्निथला, प्रदेशाध्रक्ष नाना पटोले, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्यासह महाराष्ट्रातील मातब्बर नेत्यांचा समावेश आहे. आमदार कुणाल पाटील यांनी धुळे, नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे संघटन वाढविले असून, महाराष्ट्र काँग्रेसमध्ये त्यांनी कार्याध्यक्ष म्हणून प्रभावीपणे काम केले आहे.
दरम्यान, खा. राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रानिमित्ताने नुकताच धुळे नंदुरबारचा दौरा यशस्वी झाला. आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली धुळे येथे महिला हक्क परिषद घेण्यात आली होती. या परिषदेत खा. राहूल गांधी यांनी महिलांसाठी महत्वाच्या घोषणा जाहिर केल्या. त्यामुळे धुळ्यात झालेली महिला हक्क परिषदेची देशभरात चर्चा झाली. आता पुन्हा एकदा आ. कुणाल पाटील यांच्यावर स्टार प्रचारक म्हणून काँग्रेस पक्षाने जबाबदारी सोपविल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.