महाविकास आघाडीतील बंडखोरीला घराणेशाही कारणीभूत : मंत्री गिरीश महाजन यांची टिका
धुळे : महाविकास आघाडीतील बंडखोरीला घराणेशाही कारणीभूत असल्याची टीका राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी धुळ्यात केली. नरेंद्र मोदी यांना पुन्हा प्रधानमंत्री करण्यासाठी धुळे लोकसभा मतदारसंघातून खासदार डॉ. सुभाष भामरे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहनही त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना केले.
धुळे लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ धुळे येथे मुंबई-आग्रा महामार्गालगत रिद्धीसिद्धी हॉलमध्ये शनिवारी सायंकाळी भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते.
मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजित पवार यांच्यासारखा प्रभावी नेता असताना शरद पवार यांनी आपल्या मुलीकडे नेतृत्व सोपविले. त्यामुळे त्या पक्षात बंडखोरी सुरू झाली. तशीच परिस्थिती शिवसेनेची देखील आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या जुन्या जाणत्या नेत्यांना डावलून आपल्या मुलाला प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू केल्याने बंडखोरीला वाव मिळाला. काँग्रेसमध्ये तर घराणेशाहीची परंपरा ऐतिहासिक आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर इंदिरा गांधी, त्यांच्यानंतर राजीव गांधी, त्यांच्यानंतर सोनिया गांधी आणि आता राहुल गांधींना नेतेपद बहाल केले आहे. या घराणेशाहीला कंटाळूनच महाविकास आघाडीला गळती लागली आहे. भविष्यात लवकरच महाविकास आघाडीला आणखी धक्के बसणार असल्याचे संकेतही मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. भारतीय जनता पक्षाच्या सरकारने देशात, राज्यात आणि धुळे लोकसभा मतदारसंघात केलेल्या विकासकामांची माहिती देत नरेंद्र मोदी यांना पुन्हा प्रधानमंत्री करण्यासाठी धुळे लोकसभा मतदारसंघातून डॉ. सुभाष भामरे यांना पुन्हा खासदार करावे, असे आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी शेवटी केले.
यावेळी भाजपाचे महामंत्री विजय चौधरी, खासदार डॉ. सुभाष भामरे, राज्याचे माजी पर्यटन मंत्री तथा शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल, जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, अनुप अग्रवाल यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले भाजपने केलेल्या विकास कामांची माहिती गावागावात जनतेपर्यंत पोहोचवून भाजपाच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्य मिळवून देण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
यावेळी लोकसभा निवडणूक प्रमुख माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, धुळे महानगर अध्यक्ष गजेंद्र अंपळकर, मालेगाव जिल्हाध्यक्ष निलेश कचवे, जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे, ज्येष्ठ नेते सुभाष देवरे, राम भदाणे, हिरामण गवळी, बाळासाहेब भदाणे, माजी महापौर प्रतिभा चौधरी, लोकसभा प्रभारी नारायण पाटील, बापू खलाणे, माजी महापौर जयश्री अहिरराव आदींसह भाजपचे सुपर वोरियर्स, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.