मतदार ओळखपत्रांचे वाटप पोस्टामार्फतच होते!
धुळे : मतदाराने मतदार यादीमध्ये नाव समाविष्ठ करणे, तसेच मतदार यादीमधील नाव, पत्ता, जन्मदिनांक इत्यादी दुरुस्तीसाठी फार्म नंबर 6 व 8 भरुन दिल्यानंतर फॉर्म स्विकृतीनंतर संबंधित मतदाराचे मतदार ओळखपत्र पोस्ट कार्यालयामार्फतच मोफत घरपोच वितरीत करण्यात येते. इतर कोणत्याही प्रकारे मतदार ओळखपत्रांचे वाटप होत नसल्याने मतदारांनी कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
जिल्हाधिकारी गोयल यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 02-धुळे लोकसभा मतदारसंघाची मतदान प्रक्रिया पाचव्या टप्प्यात होणार असून 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदार ओळखपत्र (ईपीक) हा मतदाराची ओळख पटविण्याचा एक महत्वाचा दस्तऐवज आहे. मतदाराने मतदार यादीमध्ये नाव समाविष्ठ करणे, तसेच मतदारयादीमधील नाव, पत्ता, जन्मदिनांक इत्यादी दुरुस्तीसाठी फार्म नंबर 6 व 8 भरुन दिल्यानंतर फॉर्म स्विकृती झाल्यानंतर संबंधित मतदाराचे मतदार ओळखपत्र पोस्ट कार्यालयामार्फत मोफत घरपोच पाठविण्यात येते.
काही कारणास्तव मतदारास मतदार ओळखपत्र (ईपीक) प्राप्त न झाल्यास त्यांने संबंधित पोस्ट ऑफीस व सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार यांचे कार्यालयास संपर्क साधणे आवश्यक आहे. मतदार ओळखपत्र हे फक्त पोस्ट ऑफीस, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) व सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार यांच्या कार्यालयामार्फतच मतदारांना वितरीत करण्यात येते. इतर कोणत्याही प्रकारे मतदार ओळखपत्र (ईपीक) चे वाटप होत नसल्याने मतदारांनी कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये, असेही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी कळविले आहे.