धुळ्याच्या तरुणाची सिनेसृष्टीत दमदार एन्ट्री, ‘संभ्रम’ वेब सिरीजमध्ये मिळाली संधी
धुळे : विद्यार्थी दशेपासूनच अभिनयाची आवड असलेला धुळे शहरातील नाट्य कलावंत कुणाल वारूडे या तरुणाची मराठी सिनेसृष्टीमध्ये दमदार एन्ट्री झाली आहे. येत्या 10 एप्रिल रोजी MX Player OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या ‘संभ्रम’ नावाच्या वेब सिरीजमध्ये तो महत्वाची भूमिका साकारतो आहे. वेब सिरीजच्या सर्वच भागांमध्ये तो प्रमुख कलाकारांसोबत दिसणार आहे. धुळे शहरातील नाभिक समाजाचे कार्यकर्ते भीमराव वारुडे यांचा तो सुपुत्र आहे.
‘संभ्रम’ वेब सिरीजविषयी : S. R. Y. Production प्रस्तुत, निर्माता आनंद मिस्त्री, लेखक रमेश भेकट आणि दिग्दर्शक सागर गोसावी यांच्या संकल्पनेतून ‘संभ्रम’ ही रहस्यमय कथा साकारली आहे. ‘संभ्रम’ एक रोमांचक कथा आहे. ही कथा कोकणातील एका सर्वसामान्य तरुणाच्या आयुष्यात अचानक घडणाऱ्या रहस्यमयी आणि असामान्य गोष्टींमुळे प्रेम, नाती, मैत्री या सर्वांमध्ये एक प्रकारचा भ्रम निर्माण करते. त्यामुळे जवळची नाती दुरावतात. प्रेक्षकांच्या मनातही भ्रम निर्माण होतो. उत्सुकता शिगेला पोहोचविणाऱ्या या वेब सिरीजमध्ये एक सुंदर असे प्रेम गीत देखील आहे.
अभिनेता कुणाल वारूडेविषयी : खानदेशवासीयांसाठी अभिमानाची बाब म्हणजे संभ्रम या वेब सिरीजमध्ये खानदेश पुत्र कुणाल भीमराव वारूडे अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. कुणालचे मुळ गाव खानदेशातील मुडावद असून, तो धुळ्याचा रहिवासी आहे. कुणालचं शिक्षण धुळ्याच्या जयहिंद संस्थेत झाले. त्याला अगदी लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्याने शाळेत व महाविद्यालयात असताना नाटकात भूमिका साकारल्या. तसेच काही पथनाट्य देखील सादर केली. त्याच्या उत्तम अभिनयासाठी त्याची 2022 यावर्षी एस. आर. वाय. प्रोडक्शन हाऊस या निर्मिती माध्यमाने ‘संभ्रम’ या वेब सिरीजसाठी निवड केली. या वेब सिरीजचे चित्रीकरण कोकणातील सावंतवाडी या गावात झाले. या वेब सिरीजसाठी कुणालने कल्पेश या पात्राची भूमिका केली आहे. त्याने या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतली असून, आपल्या पात्राला पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.