47 टक्के लोकांना गरिबी रेषेच्या वर आणले, मग 80 कोटी लोकांना मोफत धान्य का वाटप करता?
धुळे : पारदर्शक जुन्या-पुरान्या साड्या वाटप करून आमच्या आया-बहिणींची अब्रू काढणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आपल्या महिला नेत्यांना त्याच ‘मोदी’ साड्या नेसवून ग्रामीण भागात प्रचारासाठी पाठवावे, अशी विखारी टिका लोकसंग्राम पक्षाचे नेते आणि भाजपचे माजी आमदार अनिल गोटे यांनी केली.
एका बाजूला देशाचे पंतप्रधान सांगतात की, देशातील 47 टक्के लोकांना आम्ही दारिद्र्यरेषेच्या वर आणले. दुसऱ्या बाजूला ते असेही म्हणतात की, 80 कोटी लोकांना आम्ही मोफत धान्य वाटप करतो. मग गरिबी रेषेच्या वर आणलेले लोक कोणते, असा प्रश्नही अनिल गोटे यांनी उपस्थित केला.
धुळे येथे कल्याण भवनातील लोकसंग्राम पक्षाच्या कार्यालयात बुधवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, देशातील सत्तारूढ भाजप व त्यांचे नेते दिवसरात्र ढोल पिटून आम्ही 80 कोटी लोकांना फुकट खाऊ घालतो असा देशभर डांगोरा पिटत आहेत. तर दिल्लीच्या सत्तेतील भाजप नेते पाच किलो तांदूळ व तीन किलो गहू; ज्याची शासकीय किंमत केवळ 90 रुपये होते; ते दर महिन्याला विनामूल्य देण्याचे श्रेय लाटत आहेत. त्याच वेळेला देशाच्या धान्य कोठारात क्षणाक्षणाला भर टाकून अन्नधान्याच्या बाबतीत देशाला ज्या शेतकऱ्यांनी कष्ट करून, घाम गाळून स्वयंपूर्ण केले; त्या शेतकऱ्याला शेती परवडू नये अशी व्यवस्था केंद्रातील सत्ताधारी अंमलात आणत आहेत. म्हणजे शेतकरी लवकरात लवकर भूमीहीन होऊन स्वतःच्या शेतात शेतमजूर झाला पाहिजे, सरकारच्या फुकट धान्य योजनेचा लाभार्थी झाला पाहिजे, या कार्यक्रमाची बेमालूमपणे अंमलबजावणी करीत आहेत.
गरीब कुटुंब प्रमुख मुला-बाळांना जन्म देऊ शकतो पण आपल्या बायकोला, बहिणीला, आईला एक साडी घेऊ शकत नाही. भारताच्या गरिबीची अशी जगभर बदनामी करून मोफत साड्या वाटण्याच्या योजनेचा निर्लज्ज प्रचार करीत आहेत. कुठल्याही देशातील गरिबांची अब्रू घालविणारीच ही कल्पना आहे. 80 कोटी लोकांना आम्ही मोफत धान्य वाटप करतो, अशी टिमकी वाजविणे हे भाजपच्या सलग दहा वर्षातील कामकाजाची आणि गरिबांविरुद्ध अमलात आणलेल्या कार्यक्रमांची स्पष्ट कबुली आहे.
प्रधानमंत्री सन्मान योजनेखाली गरीब शेतमजुरांना सहा हजार रुपये वर्षाला त्यांच्या खात्यात जमा केले जातात. याचा अर्थ दररोज 16 रुपये 44 पैसे सन्मान वेतन म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. दारूच्या दुकानापुढे बसणारा भिकारी सुद्धा यापेक्षा जास्त कमवतो. भिक मागूनही जास्त पैसे मिळतात. मग यात कसला आला सन्मान, असा प्रश्न उपस्थित करून माजी आमदार अनिल गोटे यांनी म्हटले आहे की, 2014 मध्ये सोयाबीनला 4 हजार रुपये भाव होता. आज साडेतीन हजार रुपये आहे. कापूस 8 हजा रुपये होता. आज सात हजार 800 रुपये आहे. दुबईमध्ये कांदा 290 रुपये किलो आहे. पण निर्यातदार शेतकऱ्यांना फक्त चाळीस रुपये मिळतात. परदेशातून पिवळे वाटाणे तुर आयात करून हरभराचे भाव पाडले. शेतकऱ्यांना टोमॅटोचे बरे भाव मिळाले तर दहा लाख टन टोमॅटो नेपाळमधून आयात केला. शत्रुराष्ट्रातील शेतकरी श्रीमंत करून देशातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावले जात आहे.
केंद्रातील भाजप सरकारने, ‘गरीब कुटुंबप्रमुख आपल्या बायकोला, आईला व बहिणीला एक साडी सुद्धा घेऊ शकत नाही’ यासाठी रेशन दुकानातून वाटप केलेल्या साड्या अत्यंत निष्कृष्ट दर्जाच्या आहेत. तसेच फाटक्या आणि ठिगळ लावलेल्या जुन्या-पुरान्या आहेत. एवढेच नव्हे तर या साड्या अत्यंत पारदर्शक असून, आरपारदर्शक आहेत. अशा साड्या म्हणजे आमच्या आया-बहिणींची अब्रूचव्हाट्यावर टांगल्यासारखे आहे. वाटपासाठी आणलेल्या साड्या चांगल्या दर्जाच्या आहेत, असा दावा आजपर्यंत एकही भाजप नेत्यांनी केलेला नाही. याचा अर्थ स्वच्छ आहे की, सदर पारदर्शक साड्या वाटून दारिद्र्यरेषेखालील आदिवासी, दलित तसेच गरिबांच्या अब्रूचे सार्वजनिक धिंडवडे काढण्याचा प्रकार आहे, अशी अत्यंत विकारी टिका त्यांनी केली. लोकसंग्रामचे नेते अनिल गोटे आपल्या पत्रकात पुढे म्हणतात की, भाजपच्या देशातल्या सर्वोच्च नेत्यापासून सर्वांना माझी अत्यंत कळकळीची विनंती आहे की, गरिबांना वाटलेल्या या साड्या नेसून भाजपच्या महिला आघाडीच्या नेत्यांसह गावोगावी मते मागण्यासाठी फिरणाऱ्या भाजप महिलांना आमच्या ग्रामीण भागात प्रचारासाठी पाठवा. याचा भाजपाला दुहेरी फायदा होईल. साड्यांचा आपोआप प्रचार होईल, साड्यांवर होणारी टिका आपोआप बंद होईल. भारतीय जनता पक्षाचा एक हितचिंतक म्हणून माझी विनंती मान्य करावी, असे आवाहन अनिल गोटे यांनी केले आहे.
अनिल गोटे आपल्या पत्रकात पुढे म्हणतात की, आम्ही गरीब आहोत. याचा अर्थ भाजपामधील लब्ध प्रतिष्ठित उच्च वर्णीय नेत्यांनी आम्हाला लाचार आणि भिकारी समजण्याचे काही कारण नाही. आम्ही आमच्या आत्मसन्मानाचे रक्षण करण्यासाठी पुरेसे आणि सक्षम आहोत. हे तुम्हाला येत्या निवडणुकीत आम्ही दाखवून देऊ, एवढीच सूचना आता पुरेशी आहे, असे अनिल गोटे यांनी शेवटी पत्रकात म्हटले आहे.
या प्रसिद्धी पत्रकावर लोकसंग्राम पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत भदाणे आणि लोकसभा मतदारसंघ प्रमुख विजय वाघ यांच्या सह्या आहेत. पत्रकार परिषदेला लोकसंग्रामचे युवा नेते तेजस गोटे उपस्थित होते.