डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी, काॅंग्रेसमध्ये राजीनामा सत्र
धुळे : माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव यांना काॅंग्रेसची उमेदवारी जाहीर होताच, पक्षाच्या निष्ठावंत पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. काॅंग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरू झाले आहे. पक्षाचे धुळे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर आणि नाशिकचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी गुरुवारी राजीनामा दिला. दोन्ही जिल्हाध्यक्षांचे समर्थक आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देखील राजीनामा सत्र सुरू केले आहे. डॉ. शोभा बच्छाव यांची उमेदवारी रद्द करून नवीन स्थानिक उमेदवाराचे नाव जाहीर होत नाही, तोपर्यंत राजीनामा सत्र सुरूच राहणार असल्याचा इशारा शामकांत सनेर यांनी दिला. धुळे लोकसभा मतदारसंघात श्यामकांत सनेर आणि डॉ. तुषार शेवाळे यांची नावे सुरवातीपासूनच चर्चेत होती.
काॅंग्रेसच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे धुळे जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर हिरालाल पाटील यांनीही शामकांत सनेर यांच्या समर्थनार्थ राजीनामा दिला आहे.
डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी : धुळे लोकसभा मतदारसंघांमध्ये विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांना भाजपने तिसऱ्यांदा उमेदवारी दिल्यानंतर डॉ. भामरे यांनी गेल्या महिनाभरापासून प्रचारात आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित होण्याची प्रक्रिया दीर्घ काळापर्यंत लांबली होती. धुळे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षातर्फे पक्षाचे धुळे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर आणि नाशिकचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांची नावे चर्चेत होती. परंतु काँग्रेस पक्षाने ऐनवेळेस माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव यांना बुधवारी उमेदवारी जाहीर केली. डॉ. शोभा बच्छाव या काँग्रेस पक्षाच्या माजी राज्यमंत्री होत्या. तसेच त्या धुळे जिल्ह्याच्या पालकमंत्री देखील होत्या. त्यांना उमेदवारी जाहीर होताच धुळ्यासह नाशिक जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षातील निष्ठावंत पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.
बाहेरचा उमेदवार दिल्याने राजीनामा : काँग्रेस पक्षाचे धुळे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांनी सांगितले की, मी पक्षाचा निष्ठावंत पदाधिकारी आहे. धुळे लोकसभा मतदारसंघातून माझे नाव आघाडीवर असताना ऐन वेळेस डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी दिली. पक्षश्रेष्ठींचा हा निर्णय आमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय करणार आहे. शिवाय धुळे जिल्ह्यातील स्थानिक कार्यकर्त्यांना बाहेरचा उमेदवार मान्य नाही. त्यामुळे आपण पक्षाचे नेते नाना पटोले यांच्याकडे राजीनामा पाठविला आहे. नाशिकचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनीही राजीनामा दिला आहे. याशिवाय धुळे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये पक्षात राजीनामा सत्र सुरू झाले आहे आणि अनेक पदाधिकारी कार्यकर्ते राजीनामा देत आहेत, अशी माहिती शामकांत सनेर यांनी दिली. डॉ. शोभा बच्छाव यांची उमेदवारी रद्द करावी. तसे केले नाही तर पक्षातील निष्ठावंत पदाधिकारी आणि कार्यकर्ते लवकरच आपली वेगळी भूमिका जाहीर करतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
वंचिततर्फे अब्दुर रहेमान यांना उमेदवारी : वंचित बहुजन आघाडीने धुळे लोकसभा मतदारसंघातून आयपीएस अधिकारी अब्दुर रहेमान यांना उमेदवारी दिली आहे. अब्दुर रहेमान यांनी धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून सेवा बजावली होती. परंतु रहेमान यांचा आयपीएस अधिकारी पदाचा राजीनामा शासनाने अजुनही मंजूर केलेला नाही. त्यामुळे त्यांनी शासनाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
काॅंग्रेस पक्षातर्फे डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर धुळे लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत पहायला मिळेल, असे सध्यातरी चित्र आहे.