धुळे लोकसभा मतदारसंघात तिसरी आघाडी, राडा करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना चोप
धुळे : लोकसभेच्या निवडणुकीतील चुरस दिवसेंदिवस वाढत असून, वातावरण आणखीनच तापू लागले आहे. धुळे लोकसभा मतदारसंघांमध्ये तिसरी आघाडी स्थापन झाली असून, या आघाडीने घेतलेल्या पहिल्याच जाहीर सभेमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी राडा करण्याचा प्रयत्न केला. परंतु तिसऱ्या आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना चांगलाच चोप देऊन त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. लोकसंग्राम पक्षाचे नेते माजी आमदार अनिल गोटे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. शेवटच्या दिवशी उमेदवार देण्याचा निर्णय या सभेत झाला.
तिसऱ्या आघाडीची सभा 15 एप्रिल रोजी दाभाडी येथे झाली. याबाबत प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, भारतीय जनता पक्षाचे खासदार सुभाष भामरे यांना भाजपने तिसऱ्यांदा संधी दिल्याने धुळे मालेगाव लोकसभा मतदारसंघात तीव्र असंतोष पसरला आहे. तर काँग्रेस पक्षाकडे जुने एकनिष्ठ कार्यकर्ते जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शामकांत सनेर व काँग्रेस पक्षाचे नाशिक ग्रामीणचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी धुळे मालेगाव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. मतदारसंघातील वरील दोन्ही नेत्यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न करूनही काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी ऐनवेळी धुळे मालेगाव लोकसभेची उमेदवारी डॉ. शोभा बच्छाव यांना बहाल केली आहे.
निष्ठावान काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड आगडोंब उसळला. डॉ. शोभा बच्छाव यांना मालेगाव व धुळ्यातील कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात पाऊल सुद्धा ठेवू दिले नाही. तसेच धुळे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष शामकान सनेर व नाशिकचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी आपल्या पदाचे राजीनामे देऊन असंतोष व्यक्त केला आहे.
सर्वच विरोधी पक्षातील व भाजप पक्षातील असंतोषाला एकत्रित करून सर्वमान्य असा तुल्यबळ उमेदवार देण्यासाठी विचार मंचाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. काल अंदाजे 800 ते 1000 कार्यकर्ते दाभाडी येथील सिद्धेश्वर मंगल कार्यालयात आयोजित बैठकीला उपस्थित होते. बैठकीस मार्गदर्शन करण्याकरिता भाजप तालुका अध्यक्ष डॉ. विकास बच्छाव, धुळे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष शामकांत सनेर व इतर नेते उपस्थित होते.
सदर मेळाव्याचे कामकाज शांततेने सुरू असताना भाजपचे स्थानिक गुंड हे दारूच्या नशेत कार्यक्रमात गोंधळ घालण्याकरिता सुपारी घेऊनच आले होते. आमच्या गावातच बैठक घ्यायला तुम्ही आमची परवानगी का घेतली नाही? तसेच दाभाडीचे स्थानिक कोण? असे प्रश्न विचारून गोंधळ घालण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. त्यांना हाकलून दिल्यानंतर त्यांनी इतर गुंडांना निमंत्रित केले. त्यातील व्यवसायाने शिक्षक असलेल्या कमलेश निकम नावाच्या कार्यकर्त्याने मंचावर येऊन स्टेजवरील बॅनर फाडण्याचा प्रयत्न केला. परंतु उपस्थित तरुण कार्यकर्त्यांनी त्याला मजबूत चोप दिला. त्याच्याबरोबर आलेल्या बाकी सर्व गुंडांनी पळ काढला. एव्हाना सभेचे कामकाज संपत आले होते.
भाजपचे उमेदवार यांनी राजपूत, क्षत्रिय समाजाविरुद्ध अवमानजनक वक्तव्य करून समाजाचा अपमान केला. याबाबत निषेधाचा ठराव सरपंच प्रदीप देवरे यांनी मांडला व आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. नामपूर येथील भाजप नेते भाऊसाहेब हे आभार मानत असताना एका बाजूला लपून बसलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यांना मजबूत चोप देऊन हा प्रयत्न हाणून पाडला.
कालच्या मेळाव्यात शामकांत सनेर, डॉ. विलास बच्छाव यांनी मार्गदर्शन केले. डॉ. सुभाष भामरे यांच्या निष्क्रियतेच्या व भ्रष्टाचाराच्या सुरस कथा अनेक नेत्यांनी मांडल्या. सकाळी 11 वाजता सुरू झालेली बैठक दुपारी दोन वाजता संपली. ही पहिलीच वेळ असून यानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघाप्रमाणे बैठक घेण्यात येतील. त्यानंतर सर्व पक्षातील नेत्यांनी एकत्र बैठक घेऊन सर्वमान्य उमेदवाराची घोषणा करण्यात येईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी सर्वमान्य उमेदवाराचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाईल, असे एकमताने ठरविण्यात आले.
या सभेला डॉ. विलास बच्छाव, शामकांत सनेर, प्रकाश पाटील, अंबुदादा निकम, प्रदीप देवरे, अरुण निंबाजी देवरे, भाऊसाहेब अहिरे, राजेंद्र देवरे, नरेंद्र पाटील, रावसाहेब पवार, ललित वारुळे, भाऊसाहेब टिळे, अकबर अली, विजय वाघ, श्याम पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते. अशी माहिती चिंतन मंचाचे नेते प्रशांत भदाणे आणि लोकसंग्राम पक्षाचे लोकसभा मतदारसंघ प्रमुख विजय वाघ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.