बाहेरची नव्हे, खान्देशची कन्या! महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांचे विरोधकांना प्रत्युत्तर
धुळे : माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव यांना महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर झाल्यापासून; “त्या बाहेरच्या उमेदवार आहेत.”, “आयात उमेदवार चालणार नाही”, अशा शब्दात विरोधकांसह स्वपक्षीयांकडूनही त्यांच्यावर टीका होत आहे. परंतु “धुळे लोकसभा हीच माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. मी बाहेरची नव्हे, तर खान्देशची कन्या आहे”, असे चोख प्रत्युत्तर डॉ. शोभा बच्छाव यांनी शुक्रवारी दिले.
नाशिकचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांची नाराजी दूर झाली असून, ते प्रचाराला लागले आहेत. धुळ्याचे जिल्हाध्यक्ष शामकान सनेर यांचीही नाराजी येत्या दोन दिवसात दूर करण्यात येईल, अशी माहिती आमदार कुणाल पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
धुळे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार शुक्रवारी धुळ्यात झालेल्या बैठकीत महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी केला. वचपा काढायचा असेल तर ताईंना दोन लाखांच्या मताधिक्याने निवडून आणा, असं आवाहन धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी यावेळी केलं.
धुळे लोकसभा महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार माजी मंत्री डाॅ. शोभा बच्छाव यांच्या प्रचारार्थ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे, तसेच मित्र पक्षातील धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघ आणि धुळे शहरातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक शुक्रवारी दुपारी आमदार कुणाल पाटील यांच्या निवासस्थानी झाली.
धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले की, देशात महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न वाढल्यामुळे आराजकता पसरली आहे. काँग्रेस पक्षाने गेल्या 70 वर्षात देश उभा केला. मात्र भाजपने हा देश आणि देशातील प्रकल्प विकण्याचे काम केले. त्यामुळे देशातील लोकशाही संपुष्टात येत आहे. म्हणून देशातील सत्तास्थानावरून भाजपला हटविण्यासाठी जनतेमध्ये प्रचंड उत्साह असून, महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्या अनुषंगाने आज धुळे लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या उमेदवार डाॅ. शोभा बच्छाव यांच्या प्रचारार्थ धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघ व धुळे शहर महाविकास आघाडीच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या बैठकीचे धुळ्यात आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत भाजपाच्या उमेदवारास पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीतील सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीची वज्रमूठ आवळली.
धुळे हीच माझी जन्मभूमी असून धुळे शहर व फागणे ता. धुळे येथे माझे प्राथमिक शिक्षण झाले आहे. मालेगाव तालुक्यात सासर आणि कसमादे पट्ट्यात माहेर आहे. त्यामुळे धुळे लोकसभा मतदार संघ हीच माझी जन्मभूमी व कर्मभूमी असल्याचे सांगत मी धुळ्याची कन्या असल्याचे महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांनी बैठकीत स्पष्ट केले.