ग्रामसेवक मेघ:शाम बोरसे यांना 50 हजारांची लाच घेताना पकडले
धुळे : साक्री तालुक्यातील म्हसदी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक मेघ:शाम रोहिदास बोरसे यांना 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना धुळ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 25 एप्रिल रोजी रंगेहात पकडले. त्यांच्याविरुद्ध साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक अभिषेक पाटील यांनी सांगितले की, या प्रकरणात म्हसदी (प्र. नेर) ग्रामपंचायतीच्या महिला सदस्यांच्या पतीने तक्रार दिली होती. त्यानुसार तक्रारदार यांची पत्नी अशिक्षित असल्याने त्यांच्या वार्डात विकासकामे मंजूर होण्याकरिता त्यांच्या पत्नीच्या वतीने तक्रारदार हे सरपंच व ग्रामसेवक बोरसे यांना वेळोवेळी भेटून पाठपुरावा करीत होते. तक्रारदार व त्यांची पत्नी यांनी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक बोरसे यांची भेट घेऊन वार्डातील उर्दू शाळेत संरक्षण भिंत बांधणे, शाळेच्या आवारात पेव्हर ब्लॉक बसविणे, शाळेच्या मुला-मुलींकरिता सुलभ शौचालयाच्या कामास मंजुरी मिळण्याकरिता अर्ज दिला होता. या कामांची अंदाजपत्रकीय रक्कम 12 लाख रुपये असल्याने या किंमतीच्या 20 टक्क्याप्रमाणे दोन लाख 40 हजार रुपये काम घेणाऱ्या इच्छुक ठेकेदाराकडून आगाऊ कमिशन घेऊन द्यावे लागेल, अशी मागणी ग्रामसेवक बोरसे यांनी तक्रारदार यांच्याकडे केली. परंतु ग्रामसेवक बोरसे यांना त्यांच्या मागणीप्रमाणे लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार यांनी 4 मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे कार्यालयात येऊन तक्रार दिली होती.
सदर तक्रारीची 7 मार्च रोजी पडताळणी केली असता, ग्रामसेवक बोरसे यांनी तक्रारदार यांच्याकडे तळजोडीअंती दोन लाख रुपये लाचेची मागणी करून सदर रक्कमेपैकी 50 हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारण्याचे मान्य केले होते. त्यानुसार 25 एप्रिल रोजी सापळा आयोजित केला असता, ग्रामसेवक बोरसे यांनी तक्रारदार यांच्याकडे दोन लाख रुपये लाचेची मागणी करून त्यापैकी पहिला हप्ता 50 हजार रुपये म्हसदी ग्रामपंचायत कार्यालयात स्वतः स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याविरुद्ध साक्री पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन 1988 चे कलम सात अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रूपाली खांडवी, पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागुल, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रवीण मोरे, प्रवीण पाटील, मकरंद पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांच्या पथकाने केली.
या कारवाईत नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परीक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि वाचक पोलीस उपाधीक्षक नरेंद्र पवार यांचे मार्गदर्शन लाभले.
हेही वाचा
नवापूरचे पीआय ज्ञानेश्वर वारेंना 50 हजारांची लाच घेताना पकडले