मतदार जनजागृती महारॅलीसाठी जिल्हा परिषदेत झाली पूर्वतयारी बैठक
धुळे : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी धुळे शहरात 30 एप्रिल रोजी सकाळी सात वाजता प्रशासनातर्फे मतदार जनजागृती महारॅली काढली जाणार आहे. या महारॅलीच्या पूर्वतयारीसाठी गुरुवारी धुळे जिल्हा परिषदेमध्ये व्यापक बैठक पार पडली. महारॅलीच्या यशस्वीतेसाठी प्रशासनाने जोरदार नियोजन केले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या नवीन सभागृहात पार पडलेल्या या बैठकीला जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी मनीष पवार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, उपजिल्हाधिकारी बागडे, महानगरपालिकेच्या उपायुक्त संगीता नांदुरकर, करुणा डहाळे, रोटरी क्लबच्या देवयानी वाघ, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे दिनेश महाले, किशोर पगारे उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, जिल्हा समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क करून तृतीयपंथी मतदार, योगा क्लब, सायकलींग क्लब, लायन्स क्लब, वारकरी संप्रदाय यांनाही महारॅलीत सहभागी करून घ्यावे. तसेच महारॅलीदरम्यान पार्किंग, पाण्याची व्यवस्था, प्राथमिक उपचाराची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. महारॅलीत जास्तीत जास्त मतदारांची संख्या वाढवण्यासाठी विविध सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्था आणि शाळा-महाविद्यालयांशी संपर्क करण्याच्या सूचना दिल्या. या महारॅलीसाठी 29 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता फेर आढावा बैठक आयोजित करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
हौसिंग सोसायटी, जिल्हा बँक, कृषी उत्पन्न बाजार समिती, माथाडी कामगार, हमाल इत्यादींमध्ये जनजागृती करून जवळपास 500 मतदार महारॅलीत उपस्थितीत राहतील असे नियोजन केले जाईल, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी यांनी दिली.
ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, धुळे शहरात राहणारे सर्व ग्रामसेवक आणि त्यांच्या शेजारी राहणाऱ्या मतदारांमध्ये जनजागृती करून सुमारे 300 मतदारांचा महारॅलीत सहभाग करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
धुळे पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी सांगितले की, पंचायत समितीचे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या शेजारी राहणाऱ्या मतदारांमध्ये विशेष करून महिलांमध्ये जनजागृती करून 300 मतदारांचा सहभाग महारॅलीत वाढविण्यात येईल.
माध्यमिकचे शिक्षणाधिकारी मनीष पवार यांनी देखील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सेवानिवृत्त शिक्षक आणि या सर्वांच्या शेजारी राहणाऱ्या मतदारांमध्ये जनजागृती करून सुमारे दोन हजार मतदारांना महारॅलीत सहभागी करून घेण्याचे नियोजन असल्याचे सांगितले.
जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी दिनेश महाले आणि किशोर पगारे यांनी सांगितले की, जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये कार्यरत 200 कर्मचाऱ्यांची बाईक रॅली काढण्यात येईल.
इनर व्हील आणि रोटरी क्लबच्या 100 महिला मतदार सहभागी होतील, अशी माहिती देवयानी वाघ यांनी बैठकीत दिली.
प्राथमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले की, विविध शिक्षक संघटना आणि सेवानिवृत्त शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींशी समन्वय साधून सुमारे 800 सेवानिवृत्त शिक्षकांना मतदार जनजागृती महारॅलीत सहभागी करून घेण्यात येणार आहे.
प्रसारमाध्यमांचे 50 प्रतिनिधी महारॅलीला व्यापक स्वरूपात प्रचार आणि प्रसिद्धी देतील, अशी माहिती जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी दिली.
धुळे शहरात राहणारे महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच त्यांच्या शेजारी राहणारे मतदार असे एकूण 300 मतदार महारॅलीत सहभागी होणार आहेत, अशी माहिती उपजिल्हाधिकारी बागडे यांनी दिली.
महानगरपालिकेच्या करुणा डहाळे आणि संगीता नांदुरकर यांनी सांगितले की, महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, सफाई कामगार, बचत गटाच्या महिला असे जवळपास दोन हजार कर्मचारी महारॅलीत सहभागी होतील. तसेच कार्यक्रमस्थळी स्टेज, बॅनर, साऊंड सिस्टिम, सिग्नेचर पॉइंट, सेल्फी पॉईंट, मानवी साखळी इत्यादींच्या माध्यमातून ‘वोट कर – धुळेकर’ उपक्रम राबवण्यात येईल. नर्सिंग स्टाफ व नवमतदार यांनाही या जनजागृती कार्यक्रमात सहभागी करून घेण्यात येईल, असे सांगितले.
हेही वाचा
धुळे लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू