भाजप व काँग्रेस कडून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न अब्दुर रेहेमान यांचा पत्रकार परिषदेत आरोप
धुळे (प्रतिनिधी) : सीएए आणि एनआरसीच्या मुद्यावरून मी आयपीएस पदाचा राजीनामा दिला आहे. शासनाने राजीनामा मंजूर केला नसल्याने उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. राजीनामा मंजुरीच्या विषयावर सध्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत राजीनामा मंजूर झाला नाही तरी आपण उमेदवारी करणार असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आयपीएस अधिकारी अब्दुर रहमान यांनी स्पष्ट केलं. याबाबत वकिलांचा सल्ला घेतला असल्याचं ते म्हणाले. सामाजिक न्याय मिळविण्यासाठी आणि आर्थिक विषमता दूर करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना बहुमताने निवडून देण्याचं आवाहन त्यांनी मतदारांना केलं.
धुळे लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अब्दुर रहेमान यांनी रविवारी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या साक्री रोडवरील पत्रकार भावनात पत्रकार परिषद घेऊन पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आबा खैरनार, जिल्हाध्यक्ष अरविंद निकम, अॅड. संतोष जाधव, दिनेश बोरसे, राहुल पाटोळे, राजु वागळे, अमोल पवार आदी उपस्थित होते.
पत्रकारांसमोर भूमिका मांडताना अब्दुर रहेमान म्हणाले की, माझा जन्म शेतकरी कुटूंबात झाला. शेतकरी, गोरगरिब, दलित आदिवासींचे प्रश्न मला माहिती आहेत. तसेच पोलीस अधिकारी म्हणून देखील मी धुळे जिल्ह्यात काम केले आहे. त्यामुळे मला येथील सर्व प्रश्न देखील माहिती आहेत. केंद्र सरकारने २०१९ मध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणल्यावर राजीनामा दिला. या कायद्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाला रांगेत उभे राहावे लागेल. आणि आपली कागदपत्रे दाखवावी लागतील. गोरगरिबांच्या नागरिकत्वावर संशय घेण्याचा अधिकार म्हणजे देशद्रोह आहे. पूर्ण देशाला त्रास दिला जात आहे. तो कायदा पूर्ण देशाच्या विरोधात आहे. त्यामुळे मी राजीनामा दिला आहे. तोही स्वीकारण्यास सरकारने नकार दिला. या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली. याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे.
अब्दुर रहेमान म्हणाले, मी पोलीस अधीक्षक म्हणून धुळ्यात काम केले आहे. त्यावेळी अनेक लोक माझ्या संपर्कात आले व आजदेखील आहेत. तसेच मी धुळ्यातून निवडणूक लढलो तर येथील नागरिकांना न्याय देऊ शकतो. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना न्याय देखील मिळवून देऊ शकतो. म्हणून मी हा मतदारसंघ निवडला आहे. त्यासाठी २ किंवा ३ तारखेला उमेदवारी अर्ज देखील दाखल करणार आहे. तसेच भाजप व काँग्रेसकडून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आमची सत्ता आल्यास आम्ही नागरिकांना न्याय मिळून देऊ, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.