मंत्री गिरीश महाजन यांची शरद पवार, उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका
धुळे : पवार साहेबांनी साठ वर्षात काहीच केलं नाही. ठाकरे महाशय अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना त्यांनी घराची पायरी ओलांडली नाही. घरात झोपा झोडल्या, अशी बोचरी टीका मंत्री गिरीश महाजन यांनी शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांच्यावर केली.
धुळे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुभाष भामरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ते सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
विरोधकांकडे कोणतेही विषय नाहीत आणि बोलण्यासारखा कोणताही मुद्दा नसल्याने ते वेड्यासारखी काहीही विधानं करतात. “भाजपवाले मुंबईला महाराष्ट्रतून तोडणार, संविधान बदलणार”, या साऱ्या खोट्या बातम्या आहेत. जनतेची दिशाभूल करण्याचा प्रकार आहे. मुंबईला महाराष्ट्रातून कोणीही तोडू शकत नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केल आहे. तर संविधान बदलणं कोणाच्या बापालाही शक्य नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार म्हणत असताना अशा प्रकारच्या अफवा पसरवणं योग्य नसल्याचं गिरीश महाजन यांनी सांगितलं.
विरोधकांकडे बोलायला काही शिल्लक नसल्याने ते जनतेला सांगत सुटले आहेत की, आता मोदी लाट नाही, भाजपबद्दल नाराजी आहे. पण विरोधकांनी कितीही आटापिटा केला तरी जनतेने आणि मतदारांनी मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे ठरवले आहे. त्यामुळे भाजपचा 400 पारचा नारा खरा ठरणार आहे. भाजपला स्पष्ट बहुमत देण्याचा निर्णय देशवासीयांनी घेतला आहे. त्यामुळे चार जूनला निकाल लागल्यावर विरोधकांना कळेल की, आपण खोट्या विश्वामध्ये आणि खोट्या स्वप्नांमध्ये वावरत होतो, असे प्रत्युत्तर गिरीश महाजन यांनी विरोधकांना दिले.
हेही वाचा
प्रचंड शक्ती प्रदर्शनाने महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
बागलाणच्या लहानु साबळेंची अपक्ष उमेदवारी